नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २,४३१ बाक खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार असून पुढील एक महिन्यात आवश्यक त्या शाळेत पुरवठा केला जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यातील इतर सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत असताना मनपा शाळेतील उपस्थिती वाढत आहे. अनेक शाळांमध्ये बाक कमी पडत असल्यामुळे ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तेथील मुख्याध्यापकांनी केली होती. शिक्षण मंडळाने याविषयी प्रस्ताव तयार करून तो सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण सभेत सादर केला होता. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून बाक खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर केला होता. पहिली ते चौथीसाठी १,६७६, पाचवी ते आठवीसाठी ४६९, नववी व दहावीसाठी २८६ बाक खरेदी करणे प्रस्तावित केले आहे. यासाठी तब्बल एक कोटी ८२ लाख ९६ हजार रुपये खर्च होणार आहेत.स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर बाक खरेदी केली जावी. ज्या शाळांमध्ये आवश्यकता आहे, त्या शाळांमध्ये तत्काळ त्यांचे वितरण केले जावे, अशी भूमिका व्यक्त केली असून प्रशासनानेही एक महिन्यात बाक उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले आहे.
महापालिका खरेदी करणार २,४३१ बाक; १ कोटी ७२ लाख खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 6:17 AM