नवी मुंबई : आरोग्य विभागासाठी अद्ययावत औषध भांडरगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ७ कोटी ९३ लाख रूपये खर्च करून घणसोली सेक्टर ९ मध्ये तीन मजली इमारत उभारण्यात येणार असून या प्रस्तावास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.
महापालिकेने शहरवासीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा उभारली आहे. २३ नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रूग्णालय सुरू केले आहे. प्रत्येक वर्षी आरोग्य विभागावर १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. मोठ्याप्रमाणात औषधे खरेदी करावी लागत आहेत. सद्यस्थितीमध्ये बेलापूरमधील माता बाल रूग्णालयात औषध भांडारगृह सुरू केले आहे. तेथील जागा अपुरी पडू लागली आहे. यामुळे शहरात अद्ययावत भांडारगृह असावे अशी मागणी केली जात होती. यासाठी सिडकोने घणसोली सेक्टर ९ मधील भुखंड क्रमांक ३ उपलब्ध करून दिला आहे. ९४९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भुखंडावर तीन मजली इमारत उभी केली जाणार आहे. तळ मजल्यावर ३ कार्यालये, १ स्टोअर रूम, दुसऱ्या व तिसºया मजल्यावर भव्य स्टोअर रूमची व्यवस्था असणार आहे. येथे औषध ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसीत केली जाणार आहे.
औषध भांडारगृह उभारण्यासाठी पुणे व इतर ठिकाणी असलेल्या राज्य शासनाच्या भांडरगृहांची पाहणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे. तीन मजली इमारत बांधण्यासाठी ७ कोटी ९३ लाख रूपये खर्च होणार आहेत. पुढील १८ महिन्यात हे काम पुर्ण होणार आहे.भांडरगृहाचे काम पुर्ण झाल्यानंतर औषधे ठेवण्यासाठीची गैरसोय दूर होणार आहे.