मराठा आंदोलकांना महापालिका २४ तास पुरविणार पाणी, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी राखीव बेड
By नामदेव मोरे | Updated: January 24, 2024 18:15 IST2024-01-24T18:15:04+5:302024-01-24T18:15:37+5:30
याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून, वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मराठा आंदोलकांना महापालिका २४ तास पुरविणार पाणी, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी राखीव बेड
नवी मुंबई : मराठा आंदोलनानिमित्त लाखो नागरिक २५ जानेवारीला मुंबई बाजार समितीमध्ये मुक्कामासाठी येणार आहेत. या सर्वांसाठी बाजार समितीमधील पाणीपुरवठा २४ तास सुरू ठेवला जाणार आहे. याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून, वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आंदोलनानिमित्त नवी मुंबईत येणाऱ्या राज्यातील मराठा समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व शासकीय आस्थापनांनीही तयारी सुरू केली आहे. बाजार समितीमध्ये रात्री मुक्काम करणारे आंदोलक २६ जानेवारीला पहाटे मुंबईकडे रवाना होणार आहेत. या सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिकेने मार्केटमधील पाणीपुरवठा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मार्केटमध्ये पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. बाजार समिती व सकल मराठा समाजाच्या माध्यमातून टँकरचीही व्यवस्था केली असून, ते ठिकठिकाणी उभे करून ठेवले जाणार आहेत. यासाठीही महानगरपालिका पाणी उपलब्ध करून देणार आहे.
बाजार समितीमध्ये झालेल्या नियोजन बैठकीमध्ये महानगरपालिकेने त्यांच्या रुग्णालयामध्ये बेड राखीव ठेवावेत, अशी विनंतीही केली आहे. यासाठीही महानगरपालिकेने सहमती दर्शविली आहे. याशिवाय महानगरपालिका व खासगी हॉस्पिटल, केमिस्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचारांची व इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महानगरपालिकेने अग्निशमन दलालाही दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
मराठा आंदोलनासाठी येणारे नागरिक बाजार समितीमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. इतरही आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे.
राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका