ऑटो डिसीआर प्रणालीविषयी महानगरपालिकेची कार्यशाळा, मनपा अधिकाऱ्यांसह वास्तुविशारदांची उपस्थिती
By नामदेव मोरे | Published: March 13, 2023 04:29 PM2023-03-13T16:29:38+5:302023-03-13T16:29:55+5:30
बीपीएमएस संगणक प्रणालीसह ऑटो डिसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिली असून याविषयी अधिकारी, कर्मचारी, व वास्तुविशारदांना माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने कार्यशाळेचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : बांधकाम परवानग्यांमध्ये अधुनिकता व पारदर्शीपणा येण्यासाठी शासनाने विकास प्रस्तावांची ऑनलाईन छाननी करण्याच्या सूचना महानगरपालिकांना दिल्या आहेत. बीपीएमएस संगणक प्रणालीसह ऑटो डिसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिली असून याविषयी अधिकारी, कर्मचारी, व वास्तुविशारदांना माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने कार्यशाळेचे आयोजन केले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळेत मनपाच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी महानगरपालिका विकासक व वास्तुविशारद यांच्या अडचणी सोडविण्यास नेहमीच कटीबद्ध आहे. ऑटो डिसीआर प्रणालीविषयी सर्वांना माहिती मिळावी व शंकांचे निरसन व्हावे यासाठी कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. स्वॉफ्टटेक कंपनीचे निखिक कापसे, अंकित पटाणी, सचिन सिन्नरकर यांनी ऑटो डिसीआर प्रणालीचा वापर कसा करायचा याविषयी माहिती दिली.
प्रीडीसीआर स्वतंत्र स्वॉफ्टवेअरमध्ये वास्तुविशारद जे ऑटोकॅड वापरतात त्या आवृत्तीशी सुसंगत असून ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी सदर नगाशे प्रमाणित करून येतात. प्रत्येक प्रकल्पाचे रिअर टाईम टॅकिंग करता येत असल्याचेही यावेळी सांगितले. कार्यशाळेला महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, बांधकाम व्यवसायिक व वास्तुविशारद उपस्थित होते.