महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 01:16 AM2020-12-14T01:16:53+5:302020-12-14T01:17:02+5:30

शहरात सर्रास वापर सुरू; कचऱ्यात वाढले प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण

Municipal Corporation's anti-plastic action cooled down | महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंडावली

महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंडावली

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : बंदी असताना नवी मुंबईत प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून होणारी कारवाई थंडावली आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य शासनाने निकृष्ट दर्जाच्या आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घातली. त्यानंतर फेरीवाले, मासळी मार्केट, बाजार समिती परिसर, भाजी मंडई, दुकानदार आदींकडून महापालिकेने प्लास्टीकच्या पिशव्यांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर, प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईमध्ये शहरातील आठही नोडमधून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घेण्यात आलेल्या अनलॉकमध्ये हळूहळू सर्व उद्योगधंदे पूर्वपदावर आले आहेत. नवी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्लास्टीकच्या पिशव्यांचा फेरीवाल्यांकडून सर्रास वापर केला जात असून, कचऱ्यात प्लास्टीक पिशव्यांचे प्रमाण वाढले आहे. प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर होणाऱ्या कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर सातत्याने कारवाया करण्यात येत असून, लॉकडाऊन काळातही कारवाया करण्यात आल्या आहेत. प्लास्टीक कारवाईसाठी शहरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- सुजाता ढोले, 
अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पा

प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर होणाऱ्या कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिका प्रशासनाचे खूप दुर्लक्ष झाल्याचे चित्र शहरात दिसते आहे. 

अशा प्रकारे केला दंड वसूूल
कालावधी    वसूल केलेला दंड
१ एप्रिल, २०१९ ते ३० मार्च, २०२०    ३३ लाख ३५ हजार रुपये
१ एप्रिल, २०२० ते ३० नोव्हेंबर, २०२०    २ लाख २० हजार रुपये

Web Title: Municipal Corporation's anti-plastic action cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.