नवी मुंबई : पावसाळी कालावधीत पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यादृष्टीने नाले व गटारे सफाई कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून पावसाळापूर्व गटारे सफाईचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तसेच नैसर्गिक नाल्यांमधील पाणी प्रवाहित राहण्याकरिता नाल्यातील अडथळे दूर करण्याचे साफसफाईचे काम ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मान्सूनपूर्व कामे ३0 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रि येत अडकलेली पावसाळी नाले व गटारे साफसफाईची कामे मार्गी लावण्याकरिता महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेत निवडणूक आयोगाकडून ही कामे करण्यास मान्यता मिळविलेली होती व ही कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कंत्राटदारांना दिले होते. महानगरपालिकेच्या ८ प्रशासकीय विभागात एकूण ९१ गटांमार्फत सुरू करण्यात आलेली गटारे सफाईच्या कामांचा नियमित आढावा घेतला जात असून आतापर्यंत ९५ टक्के कामे पूर्ण झालेली असून ३0 मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या कामांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.नैसर्गिक नाल्यांमधील पाणी प्रवाहित राहण्यासाठी येणारे अडथळे दूर करून त्यांच्या साफसफाईसाठी ७८ गटांमध्ये आठही विभागांत कामे सुरू असून ८६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत व त्यांचीही सफाई ३0 मेपर्यंतपूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसुरू आहे. विहित कालावधीत हीकामे पूर्ण होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाची यंत्रणा काम करीत असून दैनंदिन निरीक्षणातून याकडे लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उपआयुक्त तुषार पवार यांनी दिली.महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले व गटारे सफाई विहित कालावधीत काटेकोरपणे व्हावी व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासोबतच संबंधित विभागाचे विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता आणि पावसाळी कालावधीसाठी नियुक्त केलेले प्रत्येक विभागासाठीचे नोडल आॅफिसर यांनीही या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाकडे महापालिकेचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:12 AM