- अनंत पाटीलनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. तलावांसह दिघा येथील रेल्वेच्या धरणामधील पाण्याचाही अद्याप वापर करण्यात येत नाही. जलस्रोत भरपूर असल्यामुळे महापालिकेला व शहरवासीयांनाही या संपत्तीचे महत्त्व समजेनासे झाले आहे.राज्यातील अनेक प्रमुख शहरे व ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. फक्त नवी मुुुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असून, पावसाळ्यापर्यंत एवढे पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. एमआयडीसीचा परिसर वगळता शहरवासीयांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. धरण विकत घेतल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर जलसाठ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तब्बल १३२ विहिरी होत्या; परंतु त्यांची देखभाल केली नसल्यामुळे अनेक विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये फक्त ९४ विहिरी अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यांचीही स्थिती बिकट आहे. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये गाळ साचला आहे, वेली व झुडपे वाढली आहेत. काही विहिरींमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असूनही त्याचा वापर होत नाही. विहिरींची मालकी महापालिकेकडे आहे; परंतु त्यामधील पाणीचोरी करून त्याची विक्री केली जात आहे. विहिरींमधील गाळ काढणे, औषध टाकण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.विहिरींप्रमाणे तलावांमधील पाण्याचाही वापर होत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये २४ तलाव आहेत. अनेक तलावांमध्ये उन्हाळ्यामध्येही पाणी असते. तलाव व्हिजन अंतर्गत पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तलावांमध्ये गॅबियन वॉल टाकली. परिसराचे सुशोभीकरण केले; पण येथील पाण्याचा वापर करण्यासाठी मात्र ठोस उपाययोजना केल्या नाहीत. तलावाला लागून असलेल्या उद्यानांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. एमआयडीसीकडून एक दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. या परिसरामध्ये रेल्वेचे धरण आहे; पण त्या धरणाचे हस्तांतरण करून घेण्यास विलंब होत आहे. धरणातील पाण्याचाही काहीच उपयोग केला जात नाही. नवी मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती मिळाली असून, तिचे महत्त्व पटत नसल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागली आहे.घणसोलीमध्ये सर्वाधिक विहिरीघणसोली विभागात सर्वाधिक विहिरींची संख्या गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात आहे. पावसाळ्यापूर्वी विहिरीची साफसफाई केल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी आता अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या विहिरी आहेत की डबकी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीनबावडी विहिरींना वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे विळखा घातलेला आहे. चिंचआळी येथे ब्रिटिश राजवटीतील विहीर आहे. गुणाळे तलावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. तर रस्त्यालगत असलेल्या रानकर विहिरीची डेब्रिज व भरावामुळे दैना झाली आहे.बाहेरून रंगरंगोटीवाशी सेक्टर ७ येथील जागृतेश्वर शिवमंदिर परिसरात तलाव व दोन विहिरी आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत या विहिरींची बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली आहे; पण वाहिरीची आतून स्वच्छता न झाल्याने शेवाळे, पालापाचोळ्यामुळे पाण्यात कचरा साचलेला दिसतो. पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे ते वापरण्याजोगे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुहूगावच्या तलावालगतच्या विहिरीची अवस्थाही अशीच आहे.नेरुळमध्येही दुरवस्थानेरुळ विभागात सरसोळे गाव सेक्टर ६ येथे दोन विहिरी आहेत. दोन्ही विहिरींची अवस्था बिकट आहे. एका विहिरीवर मोठा वृक्ष आहे. तत्कालीन नगरसेवक नारायण पाटील यांच्या कार्यकाळात विहिरींची महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी दूषित झाले आहे. शिवाय येथील लोखंडी जाळ्याही गंजल्या आहेत. पालिकेच्या परवानगीशिवाय येथील पाण्याची बांधकाम व्यवसायासाठी विक्री होत आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ१ आणि २ मधील विहिरींच्या साफसफाईबाबत पाणीपुरवठा विभागाकडून ठेकेदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आठवडाभरात पाहणी करून विहिरींची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल.- मनोहर सोनावणे,कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग