नवी मुंबईत मृत्युदर रोखण्यास पालिकेचे प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:50 PM2020-07-29T23:50:58+5:302020-07-29T23:51:05+5:30
गंभीर रुग्णांकडे लक्ष देण्याचे निर्देश : कंटेन्मेंट झोनवर दिले विशेष लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील कोरोनाबळींची संख्या चारशेपेक्षा जास्त झाली आहे. यापुढे कोरोनामुळे कोणाचा ही मृत्यू होणार नाही, यावर लक्ष केंद्रित करा. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात यावे. कोणत्याही स्थितीत मृत्युदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात घरोघरी स्क्रिनिंग करून अधिक प्रभावी रीतीने रुग्ण शोधमोहीम राबविण्यास व त्यामध्ये लक्षणे आढळणाºया नागरिकांची अँटिजेन टेस्टिंग करण्यास मनपाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्णसंख्या वाढलेली दिसली, तरी कोरोनाबाधित व्यक्ती लवकर समजल्याने त्याच्यामुळे पुढे वाढू शकणारा संसर्ग त्याचे त्वरित विलगीकरण करून वेळेतच रोखण्यात यशस्वी होता येईल, असा विश्वास मनपा आयुक्तांनी व्यक्त केला आहे. त्यांनी नेरुळ विभागाचा आढावा घेताना अधिकाºयांना गंभीर रुग्णांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या क्षेत्रातील गंभीर स्थिती असलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांच्या, तसेच तो रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या संपर्कात दूरध्वनीद्वारे दिवसातून किमान एक वेळ राहावे, अशा सूचना आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग अशा इतर आजार असणाºया व्यक्तींकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या क्षेत्रातील एकही कोरोनाबाधित रुग्ण दगावता कामा नये, हे आपले ध्येय असले पाहिजे, अशा शब्दांत वैद्यकीय अधिकाºयांना सूचित केले.
कंटेन्मेंट झोन निश्चित करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. त्यासोबतच विशेषत्वाने ज्या भागात पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडतात, असे तिसºया श्रेणीचे कंटेन्मेंट झोन निश्चित करताना त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व प्रशासकीय व्यवस्थापन याचा सुयोग्य ताळमेळ ठेवला पाहिजे. कंटेन्मेंट झोनचे उद्दिष्ट सफल होईल, याचा तारतम्याने विचार करावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. कंटेन्मेंट झोन तयार करताना अत्याधुनिक गुगल मॅप पद्धतीचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सूचित केले. कंटेन्मेंट झोन जाहीर करताना त्या ठिकाणी पूर्णत: प्रवेश प्रतिबंधित करणे गरजेचे असल्याचे सांगत, आयुक्तांनी तेथील नागरिकांना औषधे, भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक गोष्टी कशा मिळतील, याचेही विभाग कार्यालयाने नियोजन करावे, असे सांगितले. पहिल्या व दुसºया प्रकारच्या कंटेन्मेंट झोनमधील प्रतिबंधित बाबींचे पालन करण्यासाठी सोसायटी, वसाहतींचे पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवावी. तिसºया श्रेणीचे कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेशाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा, असेही आयुक्तांनी निर्देशित केले. प्रत्येक कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल, असा प्रतिबंधित क्षेत्राचा बॅनर प्रदर्शित करावा, अशाही स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
खासगी डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप समूहाद्वारे रुग्ण शोध मोहिमेला गती
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती लवकरात लवकर समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या क्षेत्रातील खासगी डॉक्टरांचा व्हॉट्सअॅप समूह तयार करावा. त्यांच्याकडे येणाºया तापाच्या रुग्णांची माहिती त्वरित कळवावी व अशा व्यक्तींची अँटिजन टेस्ट त्वरित करून घ्यावी, असेही निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाºयांना दिले. खासगी डॉक्टरकडील, तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या फ्ल्यू क्लिनिकमधील ताप असलेली एकही व्यक्ती अँटिजेन टेस्टशिवाय राहू नये, असे आयुक्तांनी निर्देशित केले.