महानगरपालिकेची सानपाडा शाळा ठरली सांस्कृतीक चषकाची मानकरी; पथनाट्य स्पर्धेत शाहू विद्यालयाचे यश
By नामदेव मोरे | Published: February 28, 2024 06:19 PM2024-02-28T18:19:36+5:302024-02-28T18:19:57+5:30
सांस्कृतीक स्पर्धेमध्ये ४८०० विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजीत केलेल्या आंतरशालेय सांस्कृतीक चषक स्पर्धेमध्ये ४८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळा क्रमांक १८ सानपाडा ने विजेतेपद पटकाविले. पथनाट्य स्पर्धेमध्ये राजर्षी शाहू महाराज विद्यालयाने विजेतेपद मिळविले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने सांस्कृतीक चषकाचे आयोजन केले होते. यामध्ये पथनाट्य, गायन, नृत्य स्पर्धेचा समावेश केला होता. या स्पर्धेमध्ये सानपाडा शाळेने सर्वाधीक १२५ गुण मिळवून फिरता चषक मिळविला. पथनाट्य स्पर्धेमध्ये ७२ शाळांनी सहभाग घेवून स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, इंटरनेटचे जाळे या विषयावर पथनाट्ये सादर केली. ३५० पेक्षा जास्त प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जवळपास १२०० कलाकारांनी सहभाग घेतला. राजर्षी शाहू महाराज विद्यालय रबाळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. इंदिरानगर व महापे शाळेने दुसरा व तीसरा क्रमांक मिळविला.गायन स्पर्धेमध्ये १६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिली ते पाचवी गटात ऋत्वीक राऊत, रेहाना मुल्ला, सोहम ननावरे विजयी ठरले. ६ वी ते १० वी गटात नयन थोरात, रोहिणी झोरे, श्रशावणी गायकवाड विजेते ठरले. समुह गान स्पर्धेमध्ये लहान गटात शाळा क्रमांक ३८, ६ व ९२ विजयी ठरले. मोठ्या गटात शाळा क्रमांक ९४, ३६ व ३३ विजयी ठरले.
नृत्य स्पर्धेमध्ये २ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिली ते पाचवी गटात श्रेया वानखेडे, परी कुमार, आयेशा शेख यांनी यश मिळविले. सहावी ते दहावी गटात स्वरा रेडीज, दिप्ती मोहोड, दिव्या उंड्रे यांनी पहिला, दुसरा व तीसरा क्रमांक मिळविला. सारेगमप व सूर नवा ध्यास स्पर्धेतील विजेते अनिरूद्ध जोशी, सावित्रीज्योती मालिकेतील कलाकार अश्विनी कासार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन केले होते. विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजीत कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी उपायुक्त ललिता बाबर, अनिरूद्ध जोशी, अश्विनी कासार, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे अभिलाषा म्हात्रे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका जागरूक आहे. विद्यार्थ्यांना भव्य व्यासपिठ उपलब्ध करून दिले असून या स्पर्धेचे परिक्षण करताना बालपण अनुभवता आले.- अनिरूद्ध जोशी, गायक
मुलांमधील नृत्यकौशल्य पाहून अचंबित करणारे होते. भविष्यात या मुलांसाठी मोफत नृत्य प्रशिक्षण शिबीर घेणे आवडेल.- अश्विनी कासार, कलाकार