नवी मुंबई : नवी मुंबईमधील नगरसेवकांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. माजी उपमहापौर अविनाश लाड यांना काँगे्रसने राजापूरमधून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी नगरसेवक राहिलेल्या दोघांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळविले आहे. पालिका निवडणुकीमध्ये अपयश आलेल्या दोघांनी कालांतराने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळविले आहे.राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर महापालिकेचे नगरसेवक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातूनही अनेकांनी राजकीय कारकिर्द सुरू केली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले महापौर झालेले संजीव नाईक यांनी २००९ च्या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून यश मिळवून संसदीय राजकारणात प्रवेश केला होता. महापालिकेमध्ये नगरसेविका असलेल्या मंदा म्हात्रे यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून काम केले आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून विजय मिळविला असून, या वेळी पुन्हा भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. २००५ ते २०१० या दरम्यान नगरसेवक असलेल्या संदीप नाईक यांनी २००९ व २०१४ च्या निवडणुकीमध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. यावर्षी वडिलांसाठी त्यांना उमेदवारीचा त्याग करावा लागला आहे. विद्यमान नगरसेवक व माजी उपमहापौर अविनाश लाडही या वर्षी नशीब अजमावत आहेत. त्यांना काँगे्रसने राजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे व विठ्ठल मोरे यांनीही या पूर्वी विधानसभेला नशीब आजमावले आहे; परंतु त्यांना यश आलेले नाही. २०१४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही २००५ ची महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यांना अपयश आले होते. यानंतर त्यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे काम सुरू केले.शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी मनसेत प्रवेश करून निवडणूक लढली व जिंकलीही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही महापालिका निवडणुकीपासून झाली आहे. भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले सुरेश खाडे यांनीही सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला होता. यानंतर सांगली जिल्ह्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यांना मंत्रिपदाचीही संधी मिळाली आहे.या वेळीही महापालिकेची निवडणूूक लढविलेले आजी-माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात असून कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईमधील नगरसेवकांनाही लागले विधानसभेचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:14 AM