पावसाळी मदतकार्यासाठी महापालिकेचा आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज
By योगेश पिंगळे | Published: June 3, 2023 07:12 PM2023-06-03T19:12:39+5:302023-06-03T19:12:53+5:30
८ विभाग कार्यालये व ५ अग्निशमन केंद्रात कक्षाची स्थापना
योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महानगरपालिकेने आठही विभाग कार्यालये तसेच परिमंडळ निहाय ५ अग्निशमन केंद्रे याठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष १ जून पासून कार्यान्वित केले आहेत. या नियंत्रण कक्षाव्दारे आपत्ती काळात तात्काळ मदत पुरवली जाणार असून हे सर्व कक्ष ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दिवसरात्र कार्यरत असणार आहेत. याठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणूका करण्यात आल्या असून मदत कार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साहित्य पुरविण्यात आलेले आहे.
पावसाळी कालावधीच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी सतर्क रहावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी विशेष बैठक घेत सर्वांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती उद्भवल्यास नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारे दक्षतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामे केली असून आपापली दक्षता पथके स्थापन केली आहेत. याशिवाय महापालिकेचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत असणारे महापालिका मुख्यालयातील प्रादेशिक आपत्ती निवारण केंद्र तथा तात्काळ कृती केंद्र अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार असून त्याठिकाणीही नागरिकांना आपत्ती प्रसंगात दूरध्वनी करून अडचणी नोंदविता येणार आहेत. त्याठिकाणाहून संबंधितांना तत्पर सूचना देऊन अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे.
तात्काळ कृती केंद्रामध्ये ०२२ – २७५६७०६०, २७५६७०६१ हे दूरध्वनी क्रमांक तसेच १८००२२२३०९ आणि १८००२२२३१० हे टोल फ्री क्रमांक कार्यान्वित असून नागरिक यापैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय आठही विभाग कार्यालयांमध्ये आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कार्यवाहीवर अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांचे लक्ष राहणार असून दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. अमरिश पटनिगिरे हे आपापल्या क्षेत्राचे नोडल अधिकारी असणार आहेत. याशिवाय आठही विभागांकरिता कार्यकारी अभियंता स्तरावरील अधिका-यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह सर्व यंत्रणेने दक्ष रहावयाचे आहे व त्यातही विशेषत्वाने मोठ्या उधाण भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी होत असल्यास युध्द पातळीवर सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.