नवी मुंबई : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजपविरोधी महाविकास आघाडी असेच काहीसे चित्र सध्या तरी दिसत आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विशेषत: रिपाइंची युवक आघाडी त्यासाठी अधिक आग्रही असून, या निवडणुकीत सात जागा लढण्याचा निर्धार केला आहे. तशी मागणी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाकडे करण्यात आली आहे.नवी मुंबईत रिपाइंची ताकद बऱ्यापैकी असली तरी निवडणुकीच्या राजकारणात या पक्षाला आजपर्यंत आपली क्षमता सिद्ध करता आलेली नाही. महापालिकेच्या मागील पाच निवडणुकीत या रिपाइंला आपला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. यामागे पक्षाचे राज्यस्तरीय धोरण, स्थानिक नेत्यांचे प्रमुख पक्षांच्या नेत्यांबरोबर असलेले सुमधुर संबंध, आपसातील हेवेदावे त्यातून निर्माण झालेली गटबाजी आदीमुळे क्षमता असूनही मागील २५ वर्षांत रिपाइंला आपला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही; परंतु या वेळीची निवडणूक वेगळी आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने या निवडणुकीत आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपला थेट आवाहन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात रिपाइं हा भाजपचा मित्रपक्ष आहे. शिवाय, नवी मुंबईतील रिपाइंच्या नेत्यांचे गणेश नाईक यांच्याबरोबरचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नाईक रिपाइंला नक्कीच न्यायाची वागणूक देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या जिल्हा नेतृत्वाने युवक आघाडीसाठी सात जागा सोडाव्यात, अशी मागणी युवक आघाडीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांना देण्यात आले आहे. युवक आघाडीच्या या मागणीवर जिल्हा नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका निवडणूक: रिपाइंच्या नवी मुंबई युवक आघाडीला हव्यात सात जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:45 PM