घणसोलीतील अनधिकृत मार्केट हटवण्यात पालिका अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:32 AM2018-09-16T04:32:33+5:302018-09-16T04:33:28+5:30
सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करत, त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारीही सिडकोवर ढकलण्यात आली आहे.
नवी मुंबई : १७ वेळा प्रयत्न करूनही घणसोलीतील अनधिकृत मटण मार्केट हटवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. अखेर सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करत, त्यावरील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारीही सिडकोवर ढकलण्यात आली आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे सदर अनधिकृत मार्केट हटवण्यात चालढकल होत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.
घणसोली सेक्टर ४ येथील भूखंड क्रमांक २१६ हा फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र, सिडकोने फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवलेल्या या भूखंडावर अनेक वर्षांपासून अनधिकृत मटण मार्केट चालवले जात आहे. तर काही दूधविक्रेत्यांनी व टेलिफोन बुथचालकांनीही बाहेरची जागा इतर फेरीवाल्यांना भाड्याने दिलेली आहे. त्या ठिकाणी उघड्यावर होणारी प्राण्यांची हत्या, परिसरात पडलेले मांसाचे तुकडे यामुळे लगतच्या रहिवासी सोसायट्यांमधील नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी त्यांनी पालिका विभाग अधिकारी, आयुक्त यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केलेली आहे; परंतु प्रत्येक वेळी पालिकेकडून त्या ठिकाणी कारवाईचा दिखावा केला जात आहे. यामुळे मागील काही वर्षांत त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई करूनही अनधिकृत मटण मार्केट बंद झालेले नाही. सकाळी कारवाई झाल्यानंतर दुपारी पुन्हा मार्केट जसेच्या तसे उभे असते. त्यांच्यामागे पालिका अधिकाºयांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने सदर भूखंड कायमचा अतिक्रमणमुक्त केला जात नसल्याचाही रहिवाशांचा आरोप आहे. त्या ठिकाणी जमा होणारा दुर्गंधीयुक्त कचरा रात्रीच्या वेळी परिसरातील नाले व गटारांमध्ये टाकला जातो, असे प्रकार स्थानिकांनी वेळोवेळी उघडकीस देखील आणून दिलेले आहेत. त्यानंतरही अनधिकृत मटणविक्रेत्यांवर ठोस कारवाई अथवा गुन्हे दाखल केले जात नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.
अखेर स्थानिक नगरसेविका उषा कृष्णा पाटील यांनी महासभेकडे या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर आयुक्तांकडून मिळालेल्या लेखी उत्तराने प्रशासनाच्याच कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई झाल्याचे लेखी उत्तर काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने पाटील यांना दिलेले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेच्या प्रश्न-उत्तरांमध्ये त्या ठिकाणी १२ वेळा कारवाई झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तच थेट भ्रष्ट अधिकाºयांना पाठीशी घालण्यासाठी माहिती दडपत असल्याचाही आरोप नगरसेविका उषा पाटील यांनी केला आहे. तर मटण मार्केटसाठी देखील जागा राखीव असतानाही फेरीवाल्यांसाठीच्या भूखंडावरील मटण विक्रेत्यांचे त्या ठिकाणी स्थलांतरण करण्यात चालढकल होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्याकरिता १७ वेळा कारवाई करूनही मटण मार्केट हटत नसल्याने तो भूखंड सिडकोच्या ताब्यात असल्याचे कारण पुढे करून त्यावर कारवाईचीही सिडकोची जबाबदारी असल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप होत आहे.
घणसोली हावरे चौकालगतच उघड्यावर होत असलेल्या मांसविक्रीमुळे त्रास होत असल्याच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. आजवर पालिकेने त्या ठिकाणी १७ वेळा कारवाई केलेली आहे; परंतु अद्यापही ते मार्केट जसेच्या तसे असल्याने प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आला होता. या वेळी पालिका अधिकाºयांचे अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्यासाठी सदर अनधिकृत मार्केटवरील कारवाईची जबाबदारी सिडकोवर ढकलण्यात आली आहे.
- उषा कृष्णा पाटील,
नगरसेविका