नवी मुंबई : फिफा वर्ल्ड कप २०१७ (१७ वर्षांखालील) स्पर्धेचे सामने नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. सामन्यापूर्वी सराव करण्यासाठी मुख्य स्टेडियमपासून जवळ मैदानाची गरज असून, महापालिका सीवूडमधील यशवंतराव चव्हाण मैदान त्यासाठी विकसित करणार आहे. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रीडा रसिकांना फिफा वर्ल्ड कपचे प्रचंड आकर्षण असते. फिफाच्यावतीने २०१७ मध्ये १७ वर्षांखालील मुलांचा वर्ल्ड कप होणार आहे. ही स्पर्धा जगातील अनेक देशांमध्ये खेळविली जाणार आहे. भारतामध्ये नवी मुंबईमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचीही यासाठी निवड झाली आहे. यामुळे नवी मुंबईचा लौकिक वाढणार आहे. जगभरातील नामांकित संघांना फिफाच्या नियमाप्रमाणे स्टेडियमपासून जवळच सरावासाठी मैदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. फिफा समितीने सीवूड सेक्टर १९ मधील यशवंतराव चव्हाण मैदानाची पाहणी केली असून, यासाठी महापालिकेकडे विचारणा केली आहे. सर्वसाधारण सभेने नोव्हेंबर २०१४ मध्ये या मैदानाचा विकास करण्याचा ठराव मंजूर केला होता. मैदानाच्या एक बाजूला स्केटिंग ट्रॅक विकसित केला जात आहे. या मैदानाचा विकास करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जुन्या प्रस्तावातील प्रशासकीय खर्चाच्या रकमेच्या अधीन राहून फिफाच्या नियमाप्रमाणे मैदान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदान विकसित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. परंतु या ठरावामध्ये नक्की किती खर्च येणार, याविषयी काहीही माहिती दिलेली नाही. (प्रतिनिधी)पालिकेचा खर्च कशासाठी ?फिफा ही श्रीमंत संघटना आहे. फुटबॉल विश्वचषकासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रायोजक मिळतात. या माध्यमातून प्रचंड नफाही त्यांना होत असतो. यामुळे महापालिकेने सदर मैदानाच्या विकासासाठी पैसे खर्च न करता फिफाकडूनच सदर निधी घ्यावा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. वास्तविक नवी मुंबईमध्ये फादर अॅग्नेल शाळेचे राज्यात सर्वात चांगले फुटबॉल मैदान आहे. देशभर या मैदानाचा लौकिक असताना सरावासाठी महापालिका खर्च का करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
फिफा वर्ल्ड कपच्या सरावासाठी पालिकेचे मैदान
By admin | Published: January 24, 2016 1:45 AM