नवी मुंबई : कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषत: कोणत्याही मिरवणुका किंवा प्रभात फेऱ्या न काढता महामानवाला घरीच अभिवादन करावे, असे महापालिकेने सूचित केले आहे.सध्या राज्यात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढला आहे. रूग्णसंख्या वाढत आहे. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन अंतर्गत अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना आखल्या आहेत. त्या अंतर्गत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक सोहळे आणि लग्न समारंभ आदींसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवार १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मिरवणुका, बाइक रॅली काढता येणार नाहीत. त्याऐवजी चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत महामानवाच्या प्रतिमेस किंवा पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करावे. यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवाश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेतच हे कार्यक्रम आयोजित करावेत. त्या निमित्ताने कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ नये, कोरोनाचे नियम पाळून रीतसर परवानगी घेऊन आरोग्य शिबिरे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास अनुमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पनवेलमध्ये होणार आरोग्य शिबीरे पनवेल : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त पनवेलमध्ये विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वतीने पनवेल परिसरात रक्त प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी , कामोठेतील सुषमा पाटील विद्यालय ,खारघर मधील रामशेठ ठाकूर शाळेत हे प्लाझ्मा दान शिबिर आयोजित आहे. पीपल्स इम्पावरमेंट सोसायटी आणि राहुल शिक्षक प्रसारक मंडळ संचलित लुंबिनी आरोग्य केंद्र यांच्या विद्यमाने महिलांसाठी खारघरला आरोग्य शिबिर होणार आहे. डॉ. कपिल चावरे, डॉ. प्रणिता डोंगरगावकर , शुभांशू भालेधर आदी तज्ज्ञ डॉक्टर महिलांची मोफत तपासणी करणार आहेत.