अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेची हेल्पलाइन
By Admin | Published: August 31, 2015 03:24 AM2015-08-31T03:24:12+5:302015-08-31T03:24:12+5:30
शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षांसाठी हेल्पलाइन नंबर तयार केले
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षांसाठी हेल्पलाइन नंबर तयार केले असून यापुढे अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढू लागले आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागांवर झोपड्यांसह बहुमजली इमारती बांधण्यात येत आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. बेकायदेशीर इमारतींमधील घरे विकून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. या तक्रार निवारण कक्षाद्वारे अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (८)अनुषंगाने अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याकरिता विभाग अधिकारी यांना जुलै २०१५ मध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम होत असल्यास नागरिकांना त्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे संबंधित विभाग अधिकारी यांना सहजपणे व विनामूल्य देता यावी यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये टोल फ्री दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवय पूर्वी सुरू करण्यात आलेले १८००२२२३०९ व १८००२२२३१० हे टोल फ्री नंबरही सुरूच ठेवण्यात येणार आहेत.
शहरात महापालिकेची बांधकाम पूर्वपरवानगी न घेता किंवा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता बांधलेल्या इमारतीत फ्लॅटची खरेदी करू नये. या इमारतींवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशा इमारतींना पाणीपुरवठा, मलनिस्सारण सुविधा पुरविण्यात येणार नाहीत असे पालिकेने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनीही महापालिकेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)