पालिका रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद

By Admin | Published: November 18, 2016 04:15 AM2016-11-18T04:15:16+5:302016-11-18T04:15:16+5:30

अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील

The municipal hospital's fire fighting system is closed | पालिका रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद

पालिका रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद

googlenewsNext

नामदेव मोरे / नवी मुंबई
अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी रद्द करून गुन्हा दाखल केला. पण प्रत्यक्षात महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामधील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. पालिकेचे ३०० व फोर्टीजचे १५० बेडचे रूग्णालय असूनही स्वतंत्र मलनि:सारण केंद्र नाही. यामुळे आता मनपा रूग्णालयाचीही नोंदणी रद्द करायची का, असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत.
नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रद्द करून गुन्हा दाखल केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर रूग्णालयांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामध्येही नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. अनेक वर्षांपासून येथील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. अग्निशमन दलाने वारंवार सूचना देवूनही दुरूस्तीचे काम सुरू केलेले नाही. आग लागल्यास तत्काळ विझविण्यासाठी काहीही उपाययोजना नाही. रूग्णालयामधील लिफ्टही वारंवार नादुरूस्त असते. अशा स्थितीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास रूग्णांनी बाहेर कसे निघायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने डी. वाय. पाटील रुग्णालयाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. एक हजार बेडचे रूग्णालय असल्याने त्यांच्याकडे स्वतंत्र एचटीपी प्लँट असणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. महापालिकेचे ३०० बेडचे रूग्णालय आहे, याशिवाय शेजारी फोर्टीज रूग्णालय १५० बेडचे आहे. एकूण ४५० बेडच्या या रूग्णालयांनाही स्वतंत्र एचटीपी केंद्र नसताना फक्त डी. वाय. वर कारवाई का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महानगरपालिका स्वत: नियम पायदळी तुडवत असून दुसऱ्यांवर मात्र क्षुल्लक कारणास्तव कारवाई करत आहे. शहरातील ८० टक्के रूग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये नाही. स्वतंत्र एचटीपीची सोय नाही. पालिकेने डी. वाय. पाटीलवर केलेली कारवाई आकसाने केल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित रूग्णालयामध्ये रूग्णांनी जावू नये, असे आवाहन केले आहे. यामुळे रूग्णांचाही गोंधळ उडू लागला आहे.
शहरात मोफत उपचार करणारे डी. वाय. हे एकमेव रूग्णालय आहे. तेच बंद झाले तर जायचे कुठे, असा प्रश्न रूग्णांनी विचारला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या कारवाईवर टीका केली आहे. रूग्णालयाकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, पण अशाप्रकारे गुन्हे दाखल करून व त्याविषयी प्रसिद्धी करून बदनामी करू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, या प्रश्नाचे पडसाद यापुढील पालिकेच्या सभांमध्येही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: The municipal hospital's fire fighting system is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.