नवी मुंबई : महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी व वेळेत निदान करता यावे, यासाठी शहरात तब्बल ११३ ठिकाणी तपासणी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी ३५ लाख ४० हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
देशात कॅ न्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. महिलांनाही हा आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. वेळेत निदान होऊ न शकल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. नवी मुंबईमध्येही कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी महापालिकेमधील महिला कर्मचारी व नगरसेविकांसाठी दोन शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये ९७९ महिलांनी सहभाग नोंदविला होता. महिला व बालकल्याण समितीने प्रत्येक प्रभागामध्ये शिबिर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीप्रमाणे प्रशासनाने प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. सर्व १११ प्रभागांमध्ये व मुख्यालयात दोन अशी एकूण ११३ शिबिरे आयोजित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या शिबिरांचा संपूर्ण खर्च महापालिका करणार आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीने ६८ ठिकाणी नि:शुल्क शिबिर घेण्याचे मान्य केले आहे. उर्वरित ४५ ठिकाणच्या शिबिरासाठी प्रतिशिबिर ६७ हजार रुपये खर्च होणार आहे.रुग्ण मर्यादा वाढवावीमहापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रत्येक शिबिरामध्ये १०० महिलांना सहभागी होता येणार होते; परंतु ही संख्या खूपच कमी आहे. यामुळे प्रभागामधील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना सहभागी होता यावे. याशिवाय कॅन्सरच्या लक्षणाविषयीही जनजागृती करावी, अशी मागणी नगरसेविकांनी व्यक्त केली आहे.