नवी मुंबई : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ सुरू केले आहे. ४२ कंटेन्मेंट झोनसाठी १९ विशेष शोध व स्क्रीनिंग पथके तयार केली आहेत. याशिवाय त्वरित अहवाल मिळविण्यासाठी अँटिजेन चाचणीचा वापर केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १२,२६९ झाली असून, आतापर्यंत ३५८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागांचे समन्वय अधिकारी, विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांच्यासमवेत विशेष बैठक घेऊन सर्वांनी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, तसेच स्क्रीनिंग यावर विशेष लक्ष दिले जाणार असून, सध्या ३१ जुलैपर्यंत घोषित करण्यात आलेल्या ४२ हॉटस्पॉट क्षेत्रात जास्तीतजास्त लोकांच्या तपासण्या आणि स्क्रीनिंगवर भर दिला जात आहे. मनपाने अर्ध्या तासात अहवाल मिळणाऱ्या रॅपिड अँटिजेन तपासणीला सुरुवात केली आहे. आता अहवाल त्वरित प्राप्त होत असल्याने पॉझिटिव्ह व्यक्तीचे लगेच विलगीकरण करण्यात येऊन कोरोना साखळी खंडित करण्याची कार्यवाही गतिमान होत आहे.
नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : कोरोना विरोधातील ही लढाई लढत असताना, नवी मुंबई पालिका संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत असून, प्रत्येक नागरिकाने मास्क अनिवार्य वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, नियमित हात धुणे अशा छोट्या-छोट्या, पण महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच नागरिकांचे यामध्ये संपूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.