व्हॉलीबॉल, थ्रो बॉलसह बॅडमिंटन स्पर्धेत महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी चमकले
By योगेश पिंगळे | Published: December 22, 2023 05:18 PM2023-12-22T17:18:19+5:302023-12-22T17:18:35+5:30
५२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग : वर्धापनदिनी होणार विजेत्यांचा सन्मान.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या १ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या ३२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महानगरपालिका आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यामधील व्हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धा महानगरपालिकेच्या भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सीबीडी बेलापूर येथे तर बॅडमिंटन स्पर्धा वाशी येथे नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशन आदी ठिकाणी उत्साहात झाल्या.
स्पर्धेत ३० पुरूष व २२ महिला अधिकारी, कर्मचारी समुह सहभागी झाले होते. पुरुषांमध्ये अंतिम फेरीची लढत राजेंद्र कोळी व सुर्या गझणे विरुध्द सचिन मस्तुद व सनी पाटील यांच्यामध्ये झाली. यात २१/१६ अशा ०५ गुणांच्या फरकाने राजेंद्र कोळी व सुर्या गझणे यांनी अंतिम विजेतेपद पटकाविले. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात अंतिम फेरीत अदिती कुवेसकर व रुपाली वाणीवडेकर विरुद्ध प्राजक्ता पिंगळे व प्रतिभा गोल्हार यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये २१/१७ अशाप्रकारे ०४ गुणांनी अदिती कुवेसकर व रुपाली वाणीवडेकर यांनी अंतिम विजेतेपद संपादन केले.
व्हॉलीबॉल स्पर्धेत १० विभागांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये उपांत्य फेरीत अग्निशमन विभाग विरुद्ध लेखा विभाग यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात अग्निशमन दल २१/१५ अशाप्रकारे ०६ गुणांनी विजयी होऊ अंतिम फेरीत दाखल झाले. दुसरी उपांत्य फेरी मालमत्ताकर आकारणी विभाग विरुध्द सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ यांच्यामध्ये झाली. यात मालमत्ताकर आकारणी विभाग २१/१२ अशा ०९ गुणांनी विजय संपादन करून अंतिम फेरीत दाखल झाले. व्हॉलीबॉलच्या अंतिम फेरीची लढत अग्निशमन विभाग व मालमत्ताकर आकारणी विभाग यांच्यात अतिशय चुरशीची झाली. या लढतीमध्ये अग्निशमन विभागाने २१/१८ अशा ०३ गुणांनी विजय संपादन करत अंतिम विजेतेपद पटकावले. महिला वर्गासाठी घेण्यात आलेल्या थ्रो बॉल स्पर्धेमध्ये एकूण ११ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये उपांत्य फेरीत प्रशासन विभाग विरुध्द शिक्षण विभाग यांच्यामधील सामन्यात प्रशासन विभागाने २१/१७ असा ०४ गुणांनी विजय संपादन केला व अंतिम फेरीत मजल मारली. दुसरी उपांत्य फेरी शहर अभियंता विभाग विरुद्ध सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ यांच्यामध्ये होऊन त्यात सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ हे २१/१० अशा ११ गुणांनी विजयी झाले.
थ्रोबॉलच्या अंतिम फेरीत प्रशासन विभागाने सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ यांच्यावर अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये २१/१९ अशी मात करून अंतिम विजेतेपद पटकावले. महानगरपालिकेच्या वर्धापनदिन समारंभात या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे.