पनवेल : महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरी आरोग्य केंद्राची संख्या वाढवून विशेषत: खांदा वसाहतीत आरोग्य केंद्राची उभारणी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याची मागणी नागरिकांकडून पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र, महापालिकेमार्फत ही मागणी फेटाळण्यात आली आहे.खांदा वसाहतीत आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. खांदा वसाहत आणि नवीन पनवेल याठिकाणी आरोग्य केंद्र उभारल्यास येथील रहिवाशांना प्राथमिक स्वरूपाचे औषधोपचारासाठी शहराबाहेरील आरोग्य केंद्रावर जावे लागणार नाही. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येणार नसल्याचे सांगत मोबाइल हेल्थ युनिट कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.पनवेल कार्यक्षेत्रातील लोकसंख्येनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे बंधन असल्याने नव्याने आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. या पत्रात सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात पाच आरोग्य केंद्र सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच २९ गावांसाठी मोबाइल हेल्थ युनिट कार्यान्वित असल्याचे उत्तर देण्यात आलेले आहे.खांदा वसाहतीत सिडकोने उभारलेले दि. बा. पाटील प्रशिक्षण केंद्र मागील दोन वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणचे एकूण आठ गाळे धूळखात पडले आहेत. या गाळ्यांमध्ये आरोग्य केंद्र सुरू केल्यास येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होईल, असे पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या आरोग्य केंद्रास पालिकेचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:34 AM