नवी मुंबई : ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. स्वच्छतेच्या सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरी असावी याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. आयुक्त बांगर यांनी शुक्रवारी १९ मार्च रोजी शहरातील विविध ठिकाणांच्या स्वच्छतेची पाहणी करत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
नवी मुंबई महापालिकेमार्फत शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून याकरिता विभागप्रमुख दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शहर स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासोबतच आयुक्त स्वत: विविध ठिकाणी जाऊन स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. या पाहणी दौऱ्यात यापूर्वी पाहणी केलेल्या ठिकाणी पुन्हा जाऊन आधी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली आहे काय, याची आयुक्त पुनर्पडताळणी करीत असल्याने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतादूत अधिक गांभीर्यपूर्वक कामाला लागले आहेत.
शुक्रवारी आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासन व परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच परिमंडळ २ चे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांच्यासमवेत वाशी रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म, सभोवतालचा परिसर, सेक्टर १ वाशी मिनी मार्केट, कोपरखैरणे व घणसोली विभागातील अंतर्गत परिसर, घणसोली रेल्वे स्टेशन समोरील मुख्य रस्ता, कोपरखैरणे-घणसोलीमधील मोठा नाला, गुणाली तलाव, घणसोलीगाव परिसर, नोसिल नाका वस्ती, सम्राट नगर, राबाडे खदाण तलाव, राबाडेगाव परिसर, राबाडेगाव व कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण स्थळे, ऐरोली-घणसोलीमधील सेक्टर ८ येथील मोठा नाला, ऐरोली परिसर, आंबेडकर नगर, भीमनगर, निब्बाण टेकडी परिसर अशा विविध भागांना भेटी देत अंतर्गत स्वच्छतेची तसेच शौचालये, तलाव, नाले यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
झोपडपट्टी व गावठाण भागात नागरिकांनी आपल्या दरवाजाबाहेरील जागेत कपडे, भांडी, गाड्या धुऊन रस्ता ओला करून अस्वच्छता पसरू देऊ नये. तसेच ओला व सुका कचरा घरातूनच वर्गीकरण करून नवी मुंबई महापालिकेच्या घंटागाडीतही वेगवेगळा द्यावा आणि आपला कचरा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. -अभिजीत बांगर (आयुक्त नवी मुंबई महापालिका)