नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रभाग ६ मधील नगरसेविका संगीता राजबली यादव यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, सहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरल्या आहेत. निवडणूक विभागाने तत्काळ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग ६ ओबीसीसाठी राखीव होता. राष्ट्रवादी काँगे्रसने रामआशिष यादव यांची बहीण संगीता राजबली यादव यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक अर्ज भरताना यादव यांनी ओबीस असल्याचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सांगितले होते. निवडणुकीनंतर दुर्गाविजय रामनाथ पाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जातवैधता प्रमाणपत्र बरोबर आहे का, याविषयी माहिती मागितली होती. त्यांना जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून धक्कादायक माहिती मिळाली. आमच्या कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगण्यात आले. मुंबई शहर उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मनपा आयुक्तांना पत्र देऊन यादव यांना सेतू कार्यालयातून जे जात प्रमाणपत्र देण्यात आले, ते सदर कार्यालयातून दिलेले नसून प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी व गोल शिक्काही बोगस असल्याचे सांगितले होते. जातपडताळणी समिती बांद्रा यांनीही सदर जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट केले असल्याचा दाखला १४ जानेवारीला दिला आहे. यामुळे यादव यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. निवडणूक विभागाने तत्काळ कारवाई केली असून, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १६ जानेवारी २०१६ च्या मतदार याद्या पोटनिवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. लवकरच मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. १४ जानेवारीला यादव यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर निवडणूक विभागाने गोपनीयता ठेवून सर्व सोपस्कार पूर्ण केले व ५ जानेवारीला यादव यांना अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला तिसरा मोठा झटका बसला आहे. याशिवाय दिघामधील काही नगरसेवकांवर अतिक्रमणाप्रकरणी गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेरूळमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना तळ ठोकावा लागला होता. आता प्रभाग सहाची जागा टिकविण्यासाठीही संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)यादव साम्राज्यालाही धक्काएमआयडीसीमध्ये वसलेल्या यादवनगरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामआशिष यादव यांचे प्राबल्य आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे वर्चस्व आहे. अनेक वेळा ते वादग्रस्त ठरले. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेही दाखल झाले. परंतु त्यांचे वर्चस्व कमी झाले नव्हते. परंतु संगीता रामआशिष यादव यांचे नगरसेवक पद रद्द केल्यामुळे यादव साम्राज्यालाही धक्का बसला आहे. जातवैधता प्रमाणपत्र बनावट बनविल्याचा ठपका पडला असून, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाचे नगरसेवक याच मुद्द्यावर भर देण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाची दक्षतानवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत निर्विघ्नपणे पार पडली होती. मनपाच्या निवडणूक विभागाने केलेल्या कामगिरीचे निवडणूक विभागानेही कौतुक केले होते. मनपा आयुक्त दिनेश वाघमारे, निवडणूक उपायुक्त अमरीश पटनीगिरे व या विभागातील सर्वांनीच प्रचंड मेहनत घेतली होती. संगीता राजबली यादव यांच्यावरील कारवाईविषयीही गोपनीयता बाळगण्यात आली होती. १४ जानेवारीला त्यांचे जातवैधता प्रमाणत्र अवैध ठरविले. यानंतर प्रशासनाने गाजावाजा न करता सर्व सोपस्कार पूर्ण केले व ५ फेब्रुवारीला त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेऊन तत्काळ पोटनिवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे.
नगरसेविका यादव अपात्र !
By admin | Published: February 07, 2016 2:59 AM