कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:27 AM2021-02-28T00:27:36+5:302021-02-28T00:27:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हलचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रांत रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.
गेल्या वर्षी दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने शहरातील अनेक कोविड सेंटर बंद करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून एकूण १४ कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यापैकी बारा केंद्र बंद करण्यात आले आहेत. यात वाशी सेक्टर १४, सीबीडी सेक्टर ३ येथील कोविड केअर सेंटर, नेरूळ येथील आगरी कोळी भवन, नेरूळ सेक्टर ९ येथील कोविड सेंटर, नेरूळ सेक्टर ५ येथील सावली कोविड सेंटर, ऐरोली सेक्टर ५ येथील समाज मंदिर, वाशी येथील इ.टी.सी केंद्र, कोपरखैरणे सेक्टर ५ येथील बहुउद्देशीय इमारतीतील केंद्र, ऐरोली सेक्टर १५ येथील लेवा पाटीदार सभागृह, तुर्भे सेक्टर येथील निर्यात भवन, तुर्भे सेक्टर २४ येथील राधास्वामी सत्संग भवन व वाशी येथील महापालिका रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर या उपचार केंद्रांचा समावेश आहे.
रग्ण कमी होत असल्याने महापालिकेने बंद केलेल्या कोविड केंद्राच्या जागा संबंधित संस्थांना परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यानुसार संबंधित जागांची साफसफाई आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत. औषधे आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन केले जात आहे. रुग्णवाढीचा वेग वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझर्स आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
१२४८
रुग्णांवर शहरात उपचार
नवी मुंबईत सध्या महापालिकेचे वाशी येथील सिडको एक्झिबिशनमध्ये एकमेव उपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रात २५४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्णांपैकी काही नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या महापालिकेचे वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रातील एकमेव उपचार केंद्र सुरू आहे. परंतु खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तुर्भे येथील बंद केलेले दोन उपचार केंद्र राखीव ठेवण्यात आली आहेत.
- अभिजीत बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका