श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी पालिका यंत्रणा सज्ज; २३ ठिकाणी विसर्जनाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:57 PM2019-09-11T23:57:23+5:302019-09-11T23:57:37+5:30
तलावांच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल
नवी मुंबई : श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी शहरात पोलिसांसह पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. पालिकेच्या वतीने शहरातील २३ विसर्जनस्थळांवर विशेष सोय करण्यात आली आहे. तर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवरही कारवार्इंचा धडाका लावला जाणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरात सुमारे ३० हजार घरगुती, तर ५०० सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळांमध्ये सुमारे ३०० मंडळे सोसायट्यांमधील, तर २०० मंडळे सार्वजनिक आहेत. त्यापैकी सुमारे २७ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन मागील दहा दिवसांत झाले आहे. उर्वरित श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाणार आहे. या वेळी गणेशभक्तांकडून भक्तिभावाने श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. त्याकरिता ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यानुसार शहरातील २३ विसर्जनस्थळांवर पालिकेच्या वतीने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता यावे, याकरिता तलावांच्या ठिकाणी फोर्कलिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. तर ७०० हून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक विसर्जनस्थळावर अग्निशमन दलाचे कर्मचारी, लाइफगार्ड पुरवले जाणार आहेत. तर गर्दी विभागण्यासाठी आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या देखरेखीखाली या यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे.
मूर्तींच्या विसर्जना वेळी सोबतचे निर्माल्य जमा करण्यासाठी प्रत्येक तलावांभोवती निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्याद्वारे तलावांमधील पाणी स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पालिकेच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकात गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानुसार पोलिसांतर्फेही संपूर्ण शहरात तसेच विसर्जनस्थळे व विसर्जनाच्या मार्गावर गुरुवारी सकाळपासूनच चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, त्याद्वारे गर्दीतील गैरहालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. याकरिता साध्या गणवेशातील पोलीसही बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. अनेकदा गणेशभक्तांकडून मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला जातो. त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा मद्यपींना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या वेळी मद्यपान केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्या ठिकाणी आवश्यक ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर, मद्यपान करून वाहन चालवणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. विसर्जना वेळी मंडळांकडून ध्वनिप्रदूषण होणार नाही, अशा सूचनाही पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
वाहतुकीत बदल
वाशीत मोठ्या प्रमाणात गणेशमंडळे विसर्जनासाठी येत असल्याने वाशी-कोपरखैरणे मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, त्यानुसार कोपरखैरणे मार्गे वाशीत येणारी वाहने ब्ल्यू डायमंड चौकातून कोपरी येथून पामबीच मार्गे वाशीकडे वळवली जाणार आहेत. तर वाशी रेल्वेस्थानकाकडून कोपरखैरणेकडे जाणारी वाहने वाशी प्लाझा येथून जुई पुलापासून पामबीच मार्गे अरेंजा चौकातून इच्छित स्थळी वळवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तुर्भेकडून वाशीकडे येणारी वाहने अरेंजा चौकातून डावीकडे अथवा उजवीकडे सोडली जाणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक नोडमधील तलावांच्या मार्गावर नो पार्किंग घोषित करण्यात आले असून तलावांच्या मुख्य मार्गावर विसर्जनाच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
मद्यपान करून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे भक्त तसेच वाहतुकीचे नियम मोडणारे व मद्यपान करून वाहन चालवणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. याकरिता आवश्यक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तर विसर्जनाच्या मार्गात कोणताही अडथळा होऊ नये, याकरिता तलावांच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. - सुनील लोखंडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक