महापारेषणच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:07 PM2019-08-28T23:07:20+5:302019-08-28T23:07:34+5:30
जीवितहानीचा धोका : अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर सुरूच
सूर्यकांत वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापारेषणच्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर करण्यास पालिकेसह सिडकोचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखाली नागरिकांचा वावर तसेच बांधकाम केले जाऊ नये, अशा महापारेषणच्या सूचना आहेत. यानंतरही शहरातील सर्वच ठिकाणी उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखालील जागेचा उद्यान अथवा पार्किंगसाठी वापर होताना दिसत आहे.
महापारेषणच्या अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्शुलेटरचा स्फोट झाल्याची घटना गतवर्षी आॅगस्ट महिन्यात घडली होती. या स्फोटामुळे इन्शुलेटरचा एक तुकडा त्याखालील जॉगिंग ट्रॅकवर कोसळला होता. त्यामध्ये मृणाल अनिल महाडीक (५२) या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले होते. तत्पूर्वी त्याच ठिकाणी उपरी विद्युतवाहिनी कोसळून त्याखाली उभ्या असलेल्या सात ते आठ वाहनांचे नुकसानही झाले होते. मात्र, त्यानंतरही अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर सुरूच होता. मात्र, मृणाल महाडीक यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर महापारेषणने सिडको आणि महापालिकेलाअति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या, तर त्यापूर्वीही अशा प्रकारच्या सूचना सातत्याने करण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनेला वर्ष उलटले तरीही महापालिका व सिडकोकडून महापारेषणच्या विद्युतवाहिनींखालील जागेचा वापर सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनींखालील जागा मोकळी ठेवणे आवश्यक असतानाही केवळ लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी पालिकेने काही ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. तर काही ठिकाणी मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून जागा राखीव ठेवलेली आहे. त्याशिवाय नर्सरी, चायनिस सेंटर व अनधिकृत बांधकामेही विद्युतवाहिनीखालील जागेत पाहायला मिळत आहेत.
यामुळे एखाद्या अनपेक्षित बिघाडामुळे अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी कोसळल्यास अथवा आग लागल्यास, त्याखाली वावरणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो; परंतु नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कसलाही विचार न करता अति उच्चदाबाच्या विद्युत वायरीखालील जागा नागरिकांच्या वापरास उपयुक्त बनवून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे, त्याकरिता महापारेषणच्या सूचनांना सिडको व महापालिकेकडून केराची टोपली दाखवली जात आहे. काही ठिकाणी महापारेषणच्या विद्युत खांबाला लाबूनच बैठक व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.
यावरून पालिकेच्या उद्यान विभागाचे सल्लागार व अभियंते यांच्या पात्रतेवरच संशय व्यक्त केला जात आहे. गतवर्षी मृणाल महाडीक यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर ऐरोली सेक्टर ५ येथील संबंधित उद्यानाबाहेर महापारेषणने धोक्याविषयी सूचना फलक लावलेला आहे. मात्र, उद्यानाचे प्रवेशद्वार अद्यापही नागरिकांच्या वापरासाठी खुलेच असल्याने सर्रासपणे अति उच्चदाबाच्या विद्युत वायरीखालील जागेचा वापर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत असून, त्यांच्या अशा भूमिकेबाबत महापारेषणच्या अधिकाऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.
महापारेषणच्या अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा नागरिकांना वावरण्यास मज्जाव आहे, तशा प्रकारच्या सूचना महापारेषणकडून संबंधित सर्वच प्रशासनांना वेळोवेळी केल्या जात आहेत. यानंतरही त्याखाली उद्याने, खेळाची मैदाने विकसित करून पालिकेच्या निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचा संताप ऐरोलीचे रहिवासी राहुल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीतून अधिक क्षमतेचा वीजपुरवठा होत असल्याने त्याखालील नागरिकांचा वावर जीवितावर बेतू शकतो. पावसाळ्यात हा धोका अधिक उद्भवू शकतो, त्यामुळे सदर ठिकाणच्या जागा बंदिस्त करणे हाच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पर्याय आहे. तशा प्रकारच्या सूचना महापारेषणकडून केल्या जात असतानाही संबंधित प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.