नवी मुंबई : शहरातील सर्व विभागांमध्ये समान प्रमाणात पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेने वितरण प्रणालीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरण्यासाठीच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. प्रत्येक विभागाला दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा केला जाणार असून अतीरिक्त जलस्त्रोतांचा शोधही सुरू केला आहे. नवी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. पाण्यासाठी आंदोलनही सुरू झाले आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही पाणी टंचाई होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या तक्रारींची गांभीर्याने दखल महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली आहे. विशेष बैठकीचे आयोजन करून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत असलेल्या घणसोली, ऐरोली व इतर परिसरात पुरेसे पाणी मिळत नाही. या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना करण्यात आल्या. शहर अभियंता संजय देसाई यांनी शहराची भौगोलीक परिस्थिती लक्षात घेवून पाणीपुरवठ्याचा विभागनिहाय अभ्यास करून जलकुंभ भरण्याच्या वेळांमध्यं बदल करण्याचा आराखडा बैठकीत सादर केला.
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. घणसोली विभागात सायंकाळी साडेआठ ते रात्री दोन, ऐरोली,दिघा विभागात दुपारी दोन ते पहाटे चार या वेळेत जलकुंभ भरले जाणार आहेत. शहरवासीयांना पुर्वीप्रमाणे सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसातून किमान ६ ते ७ तास पाणीपुरवठा सुरू राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. यापुढे सर्व विभागांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.
मोरबेतून ४५० दशलक्ष लीटर पाणीमहानगरपालिकेच्या मोरबे धरणात १८४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे. येथून प्रतीदिन ४५० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तेथून ६० ते ६५ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दिघा, ऐरोली, घणसोली, एमआयडीसीतील नेरूळ, शिवाजीनगर, बोनसरी,इंदिरानगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव, रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर, चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी व संपूर्ण दिघा परिसराला पाणी पुरवठा होत आहे.