शहरात साथीचे आजार कमी होत असल्याचा महापालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:20 PM2019-08-24T23:20:34+5:302019-08-24T23:20:41+5:30
मलेरियाचे वर्षभरात फक्त ९२ रुग्ण । पाण्यामुळे उद्भवणाऱ्या रुग्णसंख्येतही घट
नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना महानगरपालिकेने मात्र शहरात प्रत्येक वर्षी साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. गत वर्षभरामध्ये मलेरियाचे फक्त ९२ व पाण्यामुळे उद्भवणाºया आजाराचे ९६ रुग्ण आढळले असल्याचे स्पष्ट केले आहे.
पावसाळा सुरू झाला की साथीचे आजारही वाढतात. नवी मुंबईमध्येही प्रत्येक वर्षी डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतात. तापामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महापालिका व खासगी रुग्णालयामधील रुग्णसंख्येत जवळपास दीडपट ते दुप्पट वाढ होत असते; परंतु महापालिका प्रशासनाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालामध्ये दिली आहे. शहरामध्ये २०१४-१५ मध्ये मलेरियाचे ३५६ रुग्ण आढळले होते. गतवर्षी फक्त ९२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीमध्ये डेंग्यूचे रुग्ण ७६ वरून चारवर आले आहेत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये डास अळी फवारणी सुरू केली आहे. पाणी साठणाºया ठिकाणी गप्पी मासे सोडण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू किंवा मलेरियाचा संशयित रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेल्या परिसरातील १०० घरांचीही तपासणी केली जात आहे. या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून येणाºया पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. पिण्याचे पाणी चांगले असल्यामुळे पाण्यापासून उद्भवणाºया रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये पाण्यामुळे ३५१ जण आजारी पडले होते. गतवर्षी रुग्णांची संख्या ४० वर आली आहे.
शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याचे निदान व उपचार करण्यासाठी २७ पडताळणी केंद्र आहेत. २३ नागरी आरोग्य केंद्र, ३ सर्वसाधारण रुग्णालये व माताबाल रुग्णालयातही यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले असून शहरातील कर्मचारी, मुख्याध्यापक, खासगी रुग्णालयातील कर्मचाºयांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.