पालिका देणार जानेवारीमध्ये शैक्षणिक साहित्य
By admin | Published: November 9, 2016 04:07 AM2016-11-09T04:07:20+5:302016-11-09T04:07:20+5:30
महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षामध्येच शैक्षणीक साहित्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
नवी मुंबई : महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षामध्येच शैक्षणीक साहित्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासकिय दिरंगाईमुळे गणवेश व इतर साहित्य खरेदी करण्यास विलंब झाल्याचा ठपका नगरसेवकांनी ठेवला असून स्थायी समितीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात सर्व महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील उपस्थिती प्रत्येक वर्षी वाढत आहे. पालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, दफ्तर, वह्या, पी.टी. गणवेश, बुट, मोजे असे जवळपास १२ प्रकारचे साहित्य मोफत पुरविण्यात येते. शाळा सुरू झाली की तत्काळ शैक्षणीक साहित्य देता यावे यासाठी फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून निवीदा प्रक्रियेला सुरवात केली जाते. पण २०१६ - १७ या शैक्षणीक वर्षातील साहित्य खरेदीचे दर जास्त असल्याचे कारण देवून ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर निवीदा प्रक्रिया पुर्ण करण्यास विलंब झाल्याने जुनमध्ये साहित्य देण्यात अपयश आले. रखडलेली गणवेश खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करून दोन वर्षातील साहित्य खरेदीसाठी १५ कोटी २५ लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. पुढील ४५ दिवसामध्ये प्रत्यक्ष साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे २०१६ वर्षासाठीचे शैक्षणीक साहित्य जानेवारी २०१७ मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या दिरंगाईविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. शैक्षणीक साहित्याचे नमुणे पाहण्यासाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात यावेत. यापुर्वी एक ठेकेदारास काम दिले व बिले दुसऱ्याच्या नावाने देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. दुसऱ्याच्या नावाने बिले कशी अदा केली याविषयी प्रशासनाने जाब विचारला. प्रशासन त्यांच्या सोयीप्रमाणे निवीदेमधील अटी शर्ती तयार करत असून सोयीप्रमाणे बदलत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच विद्यार्थ्यांचे नुकसाण झाले असून त्याचे खापर स्थायी समितीवर फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते जयवंत सुतार, सभापती शिवराम पाटील, एम. के. मढवी, मिरा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीने यापुर्वी हा प्रस्ताव स्थगीत करून खुलासा मागीतला होता. शैक्षणीक साहित्याचे नमुणे दाखविण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)