नवी मुंबई : दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून होणाऱ्या पाण्यामध्ये अळ्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिघासह शहरातील सर्वच जलकुंभांची पाहणी करून लिकेज आणि इतर सर्वच समस्या सोडविण्याचे आदेश सभापती सुरेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाला दिले असून प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील सर्वच जलकुंभांचा आढावा घेतला जाणार आहे.शहरातील दिघा आणि काही भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यात १ डिसेंबर रोजी अळ्या सापडल्या होत्या, त्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. शुक्र वारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गवते यांनी या विषयावर बोलताना स्वच्छ भारत मोहीम सुरू झाली असून, दिघावासीयांना स्वच्छ पाणी देण्यात यावे, अशी मागणी केली. ज्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या त्या नागरिकांना विभाग अधिकाºयांनी दम भरल्याचा आरोप देखील गवते यांनी केला. पाण्याचे नमुने तपासणीचा खोटा अहवाल सादर केल्याने शहर अभियंत्यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. पाण्याच्या टाक्यांजवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून प्रशासनाचे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ करीत असल्याचा आरोप गवते यांनी केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी अळ्या सापडलेले पाणी तपासणीसाठी पाठविले होते की नाही, असा सवाल करीत अशा प्रकारे काम करणारे पालिकेत मोठे रॅकेट असल्याचा आरोप केला. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी गाळ आणि लिकेजच्या ठिकाणांमधून पाण्यात अळ्या निर्माण होतात तर त्याची पावसाळ्यानंतर स्वच्छता का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. सभापती कुलकर्णी यांनी साठेनगरमधील प्रत्येक पाइपलाइन तपासण्याचे, तसेच लिकेजमुळे टाक्यांजवळ निर्माण झालेला गाळ स्वच्छ करून लिकेज काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच शहरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने शहरातील सर्वच जलकुंभांची पाहणी करून समस्या सोडविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पालिका जलकुंभांचा आढावा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:23 AM