टपरीमाफियांना पालिकेचा दणका, मोक्याच्या ठिकाणची अतिक्रमणे हटविली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:59 PM2024-01-19T12:59:19+5:302024-01-19T12:59:31+5:30

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पिवळ्या, निळ्या टपऱ्या  हटविल्या आहेत. तर बेवारस वाहने, अनधिकृत बॅनरही हटविण्यास सुरुवात केली आहे.

Municipality's crackdown on Taprimafia, encroachments at strategic places were removed | टपरीमाफियांना पालिकेचा दणका, मोक्याच्या ठिकाणची अतिक्रमणे हटविली

टपरीमाफियांना पालिकेचा दणका, मोक्याच्या ठिकाणची अतिक्रमणे हटविली

नवी मुंबई : महामार्गासह मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या टपरीमाफियांविराेधात महानगरपालिकेने मोहीम उघडली आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या पिवळ्या, निळ्या टपऱ्या  हटविल्या आहेत. तर बेवारस वाहने, अनधिकृत बॅनरही हटविण्यास सुरुवात केली आहे. मार्जिनल स्पेसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांनाही नोटिसा दिल्या आहेत. पालिकेच्या मोहिमेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

स्वच्छता अभियानात देशात तिसरा नंबर मिळविणाऱ्या नवी मुंबईत आता अतिक्रमणमुक्त शहर मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशी ते नेरूळदरम्यान बसथांब्याच्या बाजूला विनापरवाना अनधिकृत टपऱ्या सुरू झाल्या होत्या.

टपरीमाफियांच्या वर्षानुवर्षांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास सुरुवात झाली आहे. मनपाच्या पथकाने सर्व टपऱ्या उचलण्यास सुरुवात केली आहे. यंत्राच्या साहाय्याने टपऱ्या उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येत आहेत. अतिक्रमणाचे पिवळे, निळे साम्राज्य खालसा झाले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना निराविक्री केंद्रे सुरू झाली होती. याशिवाय रात्री आइसक्रीम विक्रेत्यांनीही अनेक ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. या गाड्या उचलण्यासही सुरुवात केली आहे. 

नागरिकांकडून स्वागत
उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या मोहिमेचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. अनेक अनधिकृत पानटपरी चालक महानगरपालिकेच्या परवानगीचा फलक लावून व्यवसाय करीत होते. महामार्गावरही जागा अडविली होती. बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेला अडसर निर्माण झाला होता. मनपाने सर्व विभागांत कारवाई सुरू केल्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 
    रस्त्यांवरील बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडसर येऊ लागला होता. अनेक महिने रिक्षा, कार व इतर वाहने रस्त्यावर उभी करून ठेवली आहेत. या वाहनांवर धूळ साचली आहे. वाहनांच्या आजूबाजूला स्वच्छता करता येत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचू लागले होते. अशा वाहनांवर विभाग कार्यालयांच्या माध्यमातून नोटिसा चिकटविण्यात येत आहेत. 
    यानंतरही वाहन न हटविल्यास कारवाई केली जात आहे. सर्व भंगार वाहने उचलून डम्पिंग ग्राउंडवर ठेवण्यात येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते स्वच्छ होऊ लागले आहेत. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेल्या अनधिकृत बॅनरविरोधातही कारवाई केली जात आहे. 

सर्व विभागांमध्ये अनधिकृत टपरी, रोडवरील अनधिकृत आइसक्रीमच्या गाड्या, बेवारस वाहनांविरोधात मोहीम सुरू केली आहे.  मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणही हटविण्यास सुरुवात केली आहे. शहर स्वच्छतेला बाधा निर्माण करणारे व मोक्याच्या ठिकाणी जागा अडविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. 
- राहुल गेठे, उपायुक्त, 
अतिक्रमण विभाग

Web Title: Municipality's crackdown on Taprimafia, encroachments at strategic places were removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.