महिलेच्या मृत्यूप्रकरणी एकावर खुनाचा गुन्हा; कळंबोलीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:56 PM2019-10-26T23:56:47+5:302019-10-26T23:57:07+5:30
पोलिसांनी संशयितास केली अटक; खून की अपघात, तर्क-वितर्क सुरू
नवी मुंबई : कळंबोलीमध्ये भंगारचोरी करण्याच्या उद्देशाने कंपनीमध्ये गेलेल्या दोन महिलांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले होते. पळून जाताना संरक्षण भिंतीवरून उडी मारल्यामुळे एक महिला गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या महिलेला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सहकाऱ्यांनी केला होता. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हाही दाखल करून सुरक्षारक्षकास अटक केली आहे.
महिलेचा मृत्यू अपघातामुळे झाला की तिचा खून झाला, याविषयी पोलिसांनीही शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणी संतसीलन कौंडर याला अटक केली आहे. तो मुळचा पाँडेचरीमधील रहिवासी आहे. त्यांने कळंबोली स्टील मार्केटमधील गाळ्यामध्ये सुरक्षारक्षकाचे काम करत होता. तो येथे जुने स्पेअर पार्ट दुरुस्त करण्याचे कामही करायचा. या गाळ्यामधून भंगार साहित्याची चोरी होत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. २० आॅक्टोबरला तो गाळ्यामध्ये पहारा देत असताना सुनीता राठोड व कमलाबाई जाधव व इतर महिला त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आल्या. चोरी करत असताना कौंडर याने पाहिले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आठ फुटांच्या संरक्षण भिंतीवरून बाहेर उडी मारली. यामुळे कमलाबाई जाधव ही महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी सुनीता राठोड या महिलेने सुरक्षारक्षकाने मारहाण केल्यामुळे कमलाबाई जखमी झाली असल्याची तक्रार कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. महिलेचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी कौंडर याच्या विरोधात खुनाचा गुन्हाही दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशेक दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. भिंतीवरून उडी मारल्यामुळे झालेल्या दुखापतीमध्ये महिलेचा मृत्यू झाला की सुरक्षारक्षकाने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला, याविषयीही पोलीस तपास करत आहेत.
वैद्यकीय अहवालाकडे लक्ष
महिलेचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. उंचीवरून उडी मारल्यामुळे मृत्यू झाला की मारहाण झाल्यामुळे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही अभिप्राय मागविला असून त्या अभिप्रायावर पुढील तपास अवलंबून असणार आहे. मात्र, तत्पूर्वीच सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.