चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक, राज्याबाहेर पळून जात असताना पकडले
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 5, 2024 05:29 PM2024-05-05T17:29:24+5:302024-05-05T17:29:34+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे.
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती पश्चिम बंगाल येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारावे गावात शनिवारी रात्री महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या लालबानू सरदार (४५) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. मुलगा घराबाहेर गेला असता त्या घरात एकट्याच होत्या. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी लालबानू यांच्या डोक्यात जड वस्तूने घाव घालून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिवाय घटनास्थळी रक्ताने भरलेले फरशीचे तुकडे, चाकू देखील मिळून आले.
यावरून मृत महिलेच्या मुलाकडे चाकुशी केली असता मुलाचे वडील उस्मान सरदार (६०) याच्याकडून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता असे समोर आले. तर घटनास्थळी मिळून आलेला रक्ताने भरलेला शर्ट देखील त्यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मारेकरूला शोधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी पथक केले होते. त्यांनी तातडीने तपासावर जोर देऊन पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उस्मान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पती पत्नीमध्ये भांडण झाले असता डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानुसार रविवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.