पत्नीवर चाकूने वार केले; मेहुण्याला हत्येची माहिती देऊन पतीने पोलीस ठाणे गाठले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:20 AM2021-04-06T00:20:03+5:302021-04-06T08:06:21+5:30

पतीने स्वतःला केले पोलिसांच्या स्वाधीन

Murder of wife on suspicion of character in Nerul | पत्नीवर चाकूने वार केले; मेहुण्याला हत्येची माहिती देऊन पतीने पोलीस ठाणे गाठले 

पत्नीवर चाकूने वार केले; मेहुण्याला हत्येची माहिती देऊन पतीने पोलीस ठाणे गाठले 

Next

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नेरुळ सेक्टर १० येथे घडली. दोघांचा प्रेमविवाह असूनदेखील पतीचा तिच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून रविवारी त्यांच्यात वाद झाल्याने, पतीने हातोडी व चाकूने पत्नीची हत्या करून पोलीस ठाणे गाठले.

पल्लवी संदेश पाटील (वय ३२) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा संदेश पाटील याच्यासोबत दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगीदेखील आहे; परंतु कोरोनामुळे मुलीला सध्या गावी ठेवले होते. नेरुळ सेक्टर १० येथे दोघे भाड्याने राहत होते. संदेश हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी पल्लवी हिच्या डोक्यात हातोडी मारून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकूने अंगावर अनेक वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने पल्लवीच्या भावाला हत्येची माहिती देऊन तिच्या मदतीसाठी ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यास सांगून स्वतः नेरुळ पोलीस ठाणे गाठले. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पल्लवी या रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडलेल्या होत्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लग्नानंतर काही वर्षांतच संदेश हा पल्लवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. पल्लवीच्या कुटुंबीयांनी अनेकदा समजूतदेखील काढली होती. यावरून रविवारी दुपारी त्याने पल्लवीचा भाऊ सागर जाधव याची भेट घेऊन पल्लवीच्या वागण्याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी पल्लवी हिची हत्या करून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Murder of wife on suspicion of character in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.