उपशाखाप्रमुखावर खुनी हल्ला
By Admin | Published: March 30, 2017 07:01 AM2017-03-30T07:01:11+5:302017-03-30T07:01:11+5:30
शिवसेनेचे इंदिरानगर येथील उपशाखाप्रमुख इस्माईल शेखवर १० ते १५ जणांनी खुनी हल्ला केला
नवी मुंबई : शिवसेनेचे इंदिरानगर येथील उपशाखाप्रमुख इस्माईल शेखवर १० ते १५ जणांनी खुनी हल्ला केला. शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या मनपा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
तुर्भे इंदिरानगरच्या चौकामध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इस्माईल शेख थांबले होते. परिचितांबरोबर गप्पा मारत असताना इंडिगो ईसीएस एमएच ०३ बीसी ३६४६ या कारमधून व इतर वाहनांमधून जीवन गायकवाड, प्रमोद देशमुख व त्यांचे १० ते १५ साथीदार आले व शेखला लाथा, बुक्क्यांसह विटांनी मारहाण करण्यास सुरवात केली. चार ते पाच मिनिट बेदम मारहाण केल्यानंतर सर्वांनी तिथून पलायन केले. उपस्थितांपैकी काहींनी त्यांच्या कारचा फोटो काढून घेतला. या घटनेचे वृत्त समजताच शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले व इतरांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी शेखला उपचारासाठी वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले व पोलिसांना याविषयी माहिती दिली. या घटनेमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, पण सर्वांनी शांत राहण्याचे आवाहन केल्याने इतर प्रसंग टळला. बुधवारी सायंकाळपर्यंत शेखवर उपचार सुरू होते. त्याच्या हाताला, पाठीवर व मानेवर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा दावा दाखल करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळी सेनेचे पदाधिकारी विठ्ठल मोरे, समीर बागवान व इतरांनी रुग्णालयात जावून जखमीची विचारपूस केली. खासदार राजन विचारे यांनीही या प्रकरणी पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. हल्ला करणारा संशयित जीवन गायकवाड हा इंदिरानगरमध्येच राहणारा आहे. त्याच्यावर यापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तो अनेक वर्षे तुरुंगात होता. दुसरा संशयित प्रमोद देशमुख हाही सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी ऐरोलीमधील छोटू माळीच्या खुनाचा आरोप असून या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याला अटकही झाली होती.