नवी मुंबई : पुणेच्या हिंजवडी येथे प्रियसीची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्याला वाशीतून अटक करण्यात आली आहे. तो उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयित म्हणून या तरुणाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पुणेतील हत्येचा उलगडा झाला.
वाशी रेल्वेस्थानक परिसरात एक तरुण येणार असून त्याचा कोणत्यातरी गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार बालाजी चव्हाण यांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने रविवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला होता. यावेळी ऋषभ निगम हा तरुण पोलिसांच्या हाती लागला. तो वाशीतून रेल्वेने मुंबई व तिथून उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत होता. अधिक चौकशीत त्याने हिंजवडी येथे प्रियसीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
याबाबत गुन्हे शाखा पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधला असता गुन्ह्याचा उलगडा झाला. वंदना द्विवेदी असे मृत तरुणीचे नाव असून दोघांमध्ये दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही आयटी कंपनीत काम करणारे आहेत. शुक्रवारी दोघे हिंजवडी येथील लॉजवर आले होते. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला असता ऋषभ याने स्वतकडे असलेल्या पिस्तूलमधून गोळ्या झाडून तिची हत्या केली. या घटनेनंतर तो नवी मुंबईत येऊन इथून उत्तर प्रदेशला जायच्या तयारीत होता. त्याने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल पुणेतच टाकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर हत्येमागचे नेमके कारण काय याचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.