आविष्कार देसाई, अलिबागउमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सिस्टीम दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पसंतीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याला उमेदवारांना मुरड घालावी लागली आहे. शुभ मुहूर्त साधता न आल्याने निवडणुकांच्या निकालावर काही परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये आहे.पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आजही अशा शुभ मुहूर्ताच्या चक्करमध्ये पडताना दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातही अशा अंधश्रध्दांना खतपाणी घातले जाते. शिवाजी महाराजांनी शत्रूवर आक्रमण करताना कधी मुहूर्त पाहिला नाही. त्यांनी फक्त गनिमी काव्याने अचूक वेळ साधत शत्रूला नामोहरण केले होते. त्याच रायगड जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड तालुक्यात चवदार तळ््याचा सत्याग्रह करताना मुहूर्त पाहिला नाही, तर त्या वेळची परिस्थिती आणि गरज लक्षात घेतली होती. अशा अनेक महान विभूतींनी विविध कारणांसाठी विजय प्राप्त केला आहे. अपार कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्टा केल्याशिवाय हाती काहीच लागत नाही हे त्यांनी आपल्या अनुकरणातून जगाला दाखवून दिले होते. संतांनीही ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ अशी शिकवण याच महाराष्ट्रात दिली आहे. म्हणूनच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. याच पुरोगामी महाराष्ट्रात आता नेमके उलटे होताना दिसत आहे.निवडणूकच जिंकायची असेल, तर आधी उमेदवारीचा अर्ज शुभ मुहूर्तावर भरला पाहिजे, असे पक्के काही उमेदवारांनी डोक्यात घेतले होते. तसे केले, तर विजय मिळविता येतो असा गोड समजही त्यांचा आहे. मतदारांना विकासाचे गाजर दाखवत त्यांची मते विकत घेऊन सहज जिंकता येते. हाच पॅटर्न सध्या सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येते. अपार मेहनत घेण्याची तयारी त्यांची नसल्याचे यातूनच अधोरेखित होते. कोणाच्या श्रध्देवर बोट ठेवण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही. त्यामुळे उमेदवार त्यांच्या आवडीच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करीत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गाजावाजा करीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जायचे. त्यामुळे वाहतूक कोंडी, सामान्य नागरिकांना त्रास, वाहनाचा खर्च, कार्यकर्ते गोळा करण्याची कसरत असे चित्र पूर्वी सर्रास दिसत होते.निवडणूक आयोगाने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्याने मुहूर्तावर अर्ज भरण्याला काही प्रमाणात मुरड घालावी लागली आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वच राजकीय पक्षात दिसून येते. त्यांच्याकडून कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शक्तिप्रदर्शन, उमेदवारांची यादी जाहीर करणे असे प्रकार या निवडणुकीत दिसले नाहीत.शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने विजयाबाबत काही कार्यकर्ते साशंक असल्याची चर्चा अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात ऐकावयास मिळते.
आॅनलाइन सिस्टीममुळे उमेदवारांच्या शुभ मुहूर्ताला मुरड
By admin | Published: February 06, 2017 5:00 AM