मुरुड नगरपरिषद निवडणुकीची तयारी
By admin | Published: October 4, 2016 02:37 AM2016-10-04T02:37:38+5:302016-10-04T02:37:38+5:30
मुरुड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरु वात केली असून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत
मुरुड/नांदगाव : मुरुड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरु वात केली असून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र असून शहरावर कोणाचे मजबूत प्राबल्य नसल्याने प्रत्येक पक्ष मजबूत स्थिती प्राप्त करण्यासाठी झटत आहे. लवकरच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार असून प्रचाराला दिवस सुद्धा कमी पडू नये म्हणून जो तो आतापासून प्रचारात मग्न झालेला दिसून येत आहे.
गत वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले होते.त्यांचे १२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु सुखाचे हे बलस्थान फार काळ टिकवता न आल्याने त्याच्याच सहा नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून आपल्या मर्जीचा नगराध्यक्ष बसवला होता. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून दूर राहून लोकांच्या विकासकामापासून दूर राहिला आहे. आता पुन्हा सत्ता आणणे म्हणजे बिकट बनले आहे. तर याच पक्षातले सहा नगरसेवक यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्रतेची केस सुरु असून त्याचा निकाल प्रलंबित असल्याने या निकालाकडे सुद्धा लोकांचे लक्ष वेधले आहे, याबाबीची सुद्धा लोक चर्चा करताना आढळत आहेत.तालुका चिटणीस मनोज भगत हे प्रत्येक दिवस निवडणूक पार्श्वभूमीवर चिंतन करून अगदी काळजीपूर्वक पावले उचलताना दिसत आहेत. बंडखोर सहा नगरसेवक हे या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना हा पक्ष कोणाबरोबर युती करणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सहा बंडखोर नगरसेवक यांचा कल शिवसेनेकडे असल्याचे बोलले जात आहे. आता सर्व पक्षाचे नगराध्यक्ष आरक्षणावर लक्ष असून लवकरच आरक्षण जाहीर होताच नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. मुरु ड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष सुद्धा लढवणार आहे.(वार्ताहर)