पाऊस आज येईल, उद्या येईल म्हणत सर्वांचीच उत्सुकता ताणतोय. केरळमध्ये तो दाखल झाला आहेच, आता आपल्या विभागात तो कधी बरसणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. तोवर दुधाची तहान ताकावर अर्थात सूर सरींमध्ये भिजण्याची छान संधी चालून आली आहे.
ऐरोली येथील नादवेणू संगीत अकादमीतर्फे गेल्या वर्षापासून वाद्यांच्या माध्यमातून संगीत सेवा देण्याचा वार्षिक उपक्रम सुरु झाला आहे. गेल्या वर्षीच्या उत्तम प्रतिसादानंतर यंदाही ८ जून रोजी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या मैफिलीचे वैशिष्ट्य असे, की बासरीवादक आकाश सुर्यवंशी व अंकिता सूर्यवंशी आणि त्यांचे ६० शिष्य, तसेच २० हार्मोनियम वादक विविध चित्रपटातील गीते, लोकगीते, नाट्यसंगीत, तसेच शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर करणार आहेत. तसेच पं. विवेक सोनार व उस्ताद फजल कुरेशी यांची जुगलबंदी हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. यातच सुरवंशी बंधू-भगिनीचे एकल शास्त्रीय कला वादनही होणार आहे. स्वप्नील भिसे त्यांना तबल्यावर साथ देतील. या कार्यक्रमात नादवेणू अकादमीतल्या काही शिष्याना पं. विवेक सोनार यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाईल. हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने सर्व रसिकांना कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.
८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जानकीबाई मढवी हॉल, सेक्टर ५, ऐरोली, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे, तरी रसिकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बासरी प्रशिक्षक व नादवेणूचे संस्थापक आकाश सूर्यवंशी यांनी केले आहे.