नवी मुंबई : गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझे नाते काय आहे ते बीड जिल्ह्याला माहिती आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा वारसा पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
नेरूळमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास पहिले निमंत्रण मला दिले जाते हे माझे भाग्य आहे. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. २२ वर्षे त्यांनी केलेला संघर्ष जवळून पाहिला आहे. संघर्षाचा तो वारसा चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी राज्याच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. विरोधी पक्षनेता म्हणून चुकीच्या धोरणांवर आवाज उठविण्याचे काम करत आहे. गणेश नाईक व मुंंडे यांच्यात चांगले ऋणानुबंध होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.माजी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राजकारणात मतभेद असतात, परंतु व्यक्तिगत जीवनात ऋणानुबंध जपावे लागतात. १९९० मध्ये आमदार झाल्यानंतर शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करत होतो. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. ते नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत होते, असे प्रतिपादनही नाईक यांनी यावेळी केले. रामलीला मैदानामध्ये आयोजित कार्यक्रमास महापौर जयवंत सुतार, सूरज पाटील, गिरीश म्हात्रे, प्रदीप गवस, काकासाहेब खाडे उपस्थित होते.आमचे कुटुंब ऊसतोड मजुराचे सामान्य कुटुंब आहे. कष्टकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वडील गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आयुष्यभर झिजले, परंतु आम्हाला बाजूला केल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.