पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील शेकाप नगरसेवक अजीज पटेल यांच्यावर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी १२ डिसेंबरला सभागृहाचा अवमान झाल्याप्रकरणी १५ दिवस निलंबनाची कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या कोणत्याही सभेला १५ दिवसांच्या कालावधीत पटेल यांना उपस्थित राहण्यास महापौरांनी मज्जाव केल्यांनतर पटेल यांनी महापौरांवरच उलट आरोप केले आहेत. तळोजा धरणातील गळतीसंदर्भात मी सभागृहात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याने मी या सभेला अनुपस्थित राहावे याकरिता मुद्दाम ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई करताना महापौरांनी मला या गोंधळावेळी सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले होते असे पत्रात नमूद केले आहे. मात्र, मला सभागृहातून बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या नसताना देखील महापौरांनी चुकीचा संदर्भ निलंबन पत्रात दिला. मागील महासभेत आम्ही बोलत असताना मुद्दाम आमच्या हातातील माईक बंद केले. त्यामुळेच मी नगर सचिवांच्या हातातून माईक घेतला. यामागे माझा उद्देश जनतेचे प्रश्न सभागृहासमोर मांडणे एवढाच होता. महापौरांनी त्याच दिवशी माझे निलंबन का केले नाही? असाही प्रश्न अजीज पटेल यांनी उपस्थित केला आहे.या निलंबनामागे पटेल यांनी सत्ताधाºयांवर गंभीर आरोप करीत ५ डिसेंबर रोजी मी नगर सचिवांना तळोजा येथील धरणाला लागलेल्या गळतीसंदर्भात पत्र दिले होते. या धरणाची गळती थांबविण्यासाठी पालिकेमार्फत काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण होऊन देखील धरणाची गळती थांबली नसल्याने यासंदर्भात मी सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याची कल्पना सत्ताधाºयांना लागली असल्याने त्यांनी माझे निलंबन केले आहे. यासंदर्भात मी वकिलामार्फत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे नगरसेवक पटेल यांनी सांगितले.
चुकीचा संदर्भ देत माझे निलंबन;महापौरांवरच के ला उलट आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:07 AM