फायनान्सवरील दरोड्याप्रकरणी नाडार टोळीतील दोघांना अटक, गतवर्षातील घटना : ४४ लाख ६३ हजारांचे दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:54 AM2017-10-11T02:54:20+5:302017-10-11T02:54:42+5:30
सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा टाकणा-या टोळीतील इतर दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे लुटीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
नवी मुंबई : सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा टाकणा-या टोळीतील इतर दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे लुटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीच अटकेत असलेल्या अर्पुतराज नाडार याने लपवलेले दागिने शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा पडल्याची घटना ६ आॅगस्ट २०१६ रोजी घडली होती. या दरोड्यामध्ये त्या ठिकाणचे सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी तपासात हा दरोडा नाडर टोळीने टाकल्याचे निष्पन्न झाले होते. या टोळीने यापूर्वीही देशभरात अनेक ठिकाणी ज्वेलर्सवर दरोडे टाकलेले असल्याने सर्वच ठिकाणचे पोलीस त्यांच्या शोधात होते. अखेर मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे काही जणांना अटक करून नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याकडून अधिक चौकशीत गुन्हे शाखा पोलिसांंनी नाडार टोळीचा म्होरक्या अर्पुतराज नाडार याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना अटक करून एकूण ५२ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. शिवाय सहाही जणांविरोधात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल झालेले आहे. अशातच गतमहिन्यात गुन्हे मध्यवर्ती शाखेचे सहायक उपनिरीक्षक संजय पवार यांना नाडर टोळीच्या पाहिजे असलेल्या सदस्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सह आयुक्त नितीन कौसडीकर, वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक योगेश देशमुख, अमित शेलार, हवालदार संजय पवार, पोपट पावरा, सतीश सरफरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी धारावी येथे सापळा रचून पोन्नुस्वामी तंगास्वामी नाडार याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यापूर्वीच अटकेत असलेला टोळीचा म्होरक्या अर्पुतराज नाडार याने लपवलेल्या दागिन्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार धारावी येथील मुत्तूकुमार नाडार याच्या घरी छापा टाकून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्ह्यातील मालाची विल्हेवाट लावण्यात सहकार्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, नाडार टोळीच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.