मधुकर ठाकूर
उरण :
नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भुपेंद्र घरत व त्यांच्या अन्य १० साथीदारांची विविध शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातून पुराव्याअभावी उरण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
उरण पोलिसांनी ओएनजीसीच्या पीरवाडी येथील पिंचिंगचे बांधकाम सुरू असताना भुपेंद्र घरत यांनी त्यांच्या साथीदारांनी डंपर अडवून फिर्यादी वैभव कडू व त्यांच्या साथीदारांना परवाना असलेल्या फायटर रिव्हाल्वर, चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करून धमकावून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून ८ ऑगस्ट २०२० रोजी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी पूर्ण झाल्यानंतर भुपेंद्र घरत , प्रथमेश पाटील,विनित बोंबले,अमित म्हात्रे,प्रशांत पाटील, कल्पेश भोसले, समिर पाटील,मयुर भोईर,सागर म्हात्रे,मनिष पाटील, योगेश भोसले आदी ११ आरोपींच्या विरोधात उरण न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता.
या फौजदारी खटल्याची सुनावणी मागील २१ महिन्यांपासून सुरू होती.मात्र सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाला पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत. शिवाय फिर्यादीनेच उलटतपासणी दरम्यान असा काही प्रकार घडला नसल्याचे न्यायालयात सांगितले.त्यामुळे पुरेश्या पुराव्याअभावी उरण न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पी.एन.पठाडे यांनी ११ आरोपींचीही शिक्षाधिन आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ए.आर.कदम तर आरोपींतर्फ ॲड.अमर पाटील यांनी काम पाहिले.