राजपत्रित वर्ग दोन ग्रेड पेसाठी नायब तहसीलदार संपावर; पनवेलसह रायगड जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम
By वैभव गायकर | Published: April 3, 2023 04:02 PM2023-04-03T16:02:19+5:302023-04-03T16:04:56+5:30
या संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली.
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग 2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी दि.3 पासुन बेमुदत संपाचा पवित्रा घेतला आहे.पनवेल सह रायगड जिल्ह्यात याचे परिणाम पहावयास मिळाले.या संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली.
नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याने हा संपाचा हत्यार उगारण्यात आला असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना सचिन शेजाळ यांनी स्पष्ट केले.
शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नसल्याने हे संप पुकारण्यात आले असल्याचे शेजाळ यांनी सांगितले.दरम्यान या संपाचा परिणाम स्थानिक पातळीवर होणार आहे.पुरवठा विभाग,संजय गांधी निराधार योजनेसह शेतकऱ्यांच्या संबंधित जमिनीची प्रकरणे नायब तहसीलदार हाताळत असतात यामुळे हि सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता आहे.
नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.समान काम समान वेतन या धोरणाच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांना ठरल्या प्रमाणे ग्रेड देणे गरजेचे आहे.त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी प्रतिक्रिया पनवेल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांनी दिली.
तत्कालीन अपर मुख्य सचिव,महसूल मंत्री, वित्त मंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन देखील त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने वेतन त्रुटी समितीचे अध्यक्ष के.पी. बक्षी यांचच्या समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे 4800 रुपये रवाढविण्याबाबत सादरीकरण करुनही त्याची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याची नाराजी संघटनेचे अध्यक्ष सचिन शेजाळ यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील एकुण 15 तालुक्यातील नायब तहसीलदारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रीत येऊन निदर्शन केली.
आमचा हा लढा आत्मसन्माचा लढा आहे.शासन मान्यता प्राप्त आमची संघटना असुन राज्यभरात 2200 सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत.राज्यात इतर विभागात राजपत्रित वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना 4800 ग्रेड मिळत असेल तर आम्हाला का नाही ?हि आमची महत्वाची मागणी आहे.आम्ही अतिरिक्त काही मागत नसुन नियमानुसार ठरलेल्या गोष्टींचाच पूर्तता करा अशी आमची मागणी आहे. - सचिन शेजाळ (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना )
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"