नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच भाजपला पुन्हा खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. दिघा येथील नाईक समर्थक माजी नगरसेविका अपर्णा गवते, दिपा गवते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी शिवबंधन बांधले. दिघा परिसरामध्ये गवते कुटुंबीयांचे तीन प्रभागांमध्ये वर्चस्व आहे.
गवते कुटुंबीय आतापर्यंत माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. नवीन गवते यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. काही महिन्यांपासून गवते कुटुंबियांच्या पक्षांतराविषयी चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेविका अपर्णा गवते, दिपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी उपस्थित होते. शिवबंधन बांधण्याच्या वेळी माजी सभापती नवीन गवते उपस्थित नव्हते. ते बाहेरगावी असून लवकरच तेही शिवबंधन बांधणार असल्याचे बोलले जात आहे. गवते कुटुंबीयांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल
दिघात राहणाऱ्या अभंग शिंदे यांच्या तक्रारीवरून माजी सभापती नवीन गवते यांच्यावर २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे हे पूर्वी गवते यांचे कार्यकर्ते होते. परंतु मतभेद झाल्यामुळे त्यांनी सेनेत प्रवेश केला. गुन्हा दाखल केल्यानंतर एक आठवड्यात नवीन गवते कुटुंबातील दोन माजी नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.