नाईक भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांची मोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:01 AM2019-07-29T04:01:29+5:302019-07-29T04:01:53+5:30

पालिकेत सत्तांतराची शक्यता : राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांची मोट

Naik on the way to BJP? 52 ncp corporator ready to join bjp | नाईक भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांची मोट

नाईक भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांची मोट

googlenewsNext

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. पहिल्या टप्यात ५२ नगरसेवकांसह आमदार संदीप नाईक भाजपात प्रवेश करतील. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक सुध्दा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये जातील, अशा अटकळी राजकीय तज्ज्ञांकडून बांधल्या जात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महापालिकेत सुध्दा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्यांत आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या नावाची सुध्दा चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी नाईक यांचे आमदार पुत्र संदीप नाईक हे अधिक आग्रही असल्याचे समजते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाण्याचा आग्रह नाईक यांच्याकडे धरला होता. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी जाहिर ग्वाही गणेश नाईक यांनी दिली होती. परंतु त्यानंतर काही दिवसांतच नाईक यांच्या पक्षांतरांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुन्हा भाजप प्रवेशाचा सूर आवळला. काळाची पावले ओळखून प्रवाहबरोबर राहण्याची विनंती या वेळी नगरसेवकांनी गणेश नाईक व संदीप नाईक गणेश नाईक यांच्याकडे केल्याचे समजते. त्यानुसार आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील ५२ नगरसेवक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पालिकेत सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. नाईक यांच्या पक्षांतरानंतर पालिकेत सुध्दा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संदीप नाईक यांची सावध प्रतिक्रिया
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत काहीशी अस्वस्थता आहे. पक्षांतराबाबत दबाव वाढत आहे. मात्र गणेश नाईक यांनी यासंदर्भातील आपली भूमिका यापूर्वीच जाहिर केली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. असे असले तरी नाराज नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी आपण प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. तोपर्यंत कोणत्याही शक्यतेवर भाष्य करणे उचित होणार नाही, असे आमदार संदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Web Title: Naik on the way to BJP? 52 ncp corporator ready to join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.