झोपडपट्टी परिसरात नाईकांची पकड सैल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:44 AM2021-01-03T01:44:54+5:302021-01-03T01:45:07+5:30
वर्षभरात ८ नगरसेवकांची सोठचिठ्ठी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईचे शिल्पकार, आमदार गणेश नाईक यांनी ख्याती प्राप्त केली आहे. पक्षांतरानंतरही राज्यातील सत्तेपासून दूर राहिलेल्या नाईकांसमोर सध्या नवी मुंबई महापालिकेची सत्ता राखणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने त्यांची तयारी सुरू असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. परंतु शहरातील राजकारणाची सध्याची हवा पाहता नवी मुंबईचा गड राखणे नाईक यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील एक-दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह लहान-मोठ्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पालिकेच्या या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या सेनेने नाईक यांना चीतपट करण्यासाठी कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
त्यानुसार त्यांनी तोडफोडीच्या राजकारणाला गती दिली आहे. भाजपतील नाईक समर्थकांना गळाला लावण्यासाठी त्यांचे सर्वंकष व तितकेच अर्थपूर्ण प्रयास सुरू आहेत. आतापर्यंत या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. पहिल्या टप्प्यात नाईक यांचे कट्टर समर्थक असलेले तुर्भे स्टोअर परिसरातील सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या चार समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी दिघा परिसरातील स्थायी समितीचे माजी सभापती तथा नाईक यांचे खंदे समर्थक नवीन गवते यांच्या परिवारातील माजी नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दिघा आणि तुर्भे झोपडपट्टी परिसरातील आठ नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात नाईक यांची साथ सोडली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आणखी काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे नाईकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दिघा ते तुर्भे हा संपूर्ण परिसर झोपडपट्ट्यांचा आहे. यातील काही भाग वगळता या समस्त क्षेत्रावर नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या झोपडपट्टी क्षेत्रातूनच नाईक यांनी मतांची आघाडी घेतली होती. तसेच या विभागातील नगरसेवकांच्या बळावरच नाईक यांनी महापालिकेत वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. परंतु त्यांच्या याच वर्चस्वाला शह देण्याचा परिणामकारक प्रयत्न शिवसेनेने केला आहे. विशेष म्हणजे साथ सोडणाऱ्या कार्यकर्त्यांना नाईक यांनी नेहमीच मानाचे पद दिले आहे. गवते आणि कुलकर्णी यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदाचीही धुरा सांभाळली आहे. असे असतानाही ऐनवेळी त्यांनी साथ सोडल्याने नाईक यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नाराज भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर तोडफोडीला वेग
nमहापालिकेची येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नाईकांना धोबीपछाड देण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यानुसार हमखास निवडणूक येणाऱ्या नाईक यांच्या समर्थकांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न पालकमंत्री शिंदे यांनी चालवले आहेत.
nगेल्या वर्षभरात त्यांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. येत्या काळात भाजपचे आणखी काही महत्त्वाचे कार्यकर्ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
nत्याला प्रत्युत्तर म्हणून नाईक यांनीसुध्दा शिवसेनेच्या काही नाराजांना गळाला लावल्याची चर्चा आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत तोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.