नैनाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:18 AM2019-09-19T00:18:49+5:302019-09-19T00:18:56+5:30
मागील अनेक महिन्यांपासून प्रलंंबित असलेल्या नैना क्षेत्राच्या दुसºया टप्प्याच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून प्रलंंबित असलेल्या नैना क्षेत्राच्या दुसºया टप्प्याच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नैना क्षेत्रातील संपूर्ण म्हणजेच २२४ गावांच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत नैनाच्या पहिल्या टप्प्यातील सातव्या टीपी अर्थात नगररचना परियोजनेलासुद्धा मंजुरी मिळाल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ गावातील सुमारे ५६0 किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. या क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही भाग नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे सध्या नैनाचे क्षेत्र २२४ पुरते मर्यादित राहिले आहे. सिडकोने या क्षेत्राच्या विकासासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पनवेलजवळील २३ गावांचा समावेश असलेला पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. याच्या अंतरिम विकास योजनेला राज्य शासनानेही मंजुरी दिली आहे. उर्वरित २0१ गावांचा विकास आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला बुधवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
जमीन एकत्रिकरणाच्या माध्यमातून नगररचना परियोजनेअंतर्गत संपूर्ण नैना क्षेत्राचा विकास करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे. त्यानुसार नैनाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सहा नगररचना परियोजनांना मंजुरी मिळाली होती. बुधवारी सातव्या टीपी योजनेला मंजुरी देण्यात आली, तर आठवी टीपी योजना सूचना व हरकतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात एकूण ११ टीपी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर २0१९ पर्यंत उर्वरित सर्व टीपी योजनांना मंजुरी मिळेल, असा दावा सिडकोच्या संबंधित विभागाने केला आहे.
>विकासाचा मागोवा
नैना क्षेत्राच्या विकासाला सिडकोकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड या क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात होती. सुरुवातीच्या काळात नैना क्षेत्राचा विकास ऐच्छिक योजनेच्या माध्यमातून करण्याची योजना होती; परंतु तेथील जमीनधारकांकडून व विकासकांकडून या योजनेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी नगररचना परियोजना (टीपी स्कीम) लागू केल्याशिवाय नैना क्षेत्राचा विकास साधणे शक्य नसल्याचे सिडकोच्या लक्षात आले. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली होती. आकुर्ली गाव परिसरात सुमारे ५0 एकर क्षेत्राची पहिली टीपी स्कीम तयार करून मंजुरीसाठी ती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती. राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्यात काही सुधारणा सुचविल्या होत्या. या सुधारणेनंतर २१ सप्टेंबर २0१८ रोजी मुंबई महानगर प्रदेशातील गेल्या तीन दशकांतील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी योजनेला मंजुरी दिली होती. यात नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील आकुर्ली, बेलवली व सांगडे या गावांतील १९.१२ हेक्टर क्षेत्रफळाच्या विकासासाठी ही प्रारूप योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार रस्ते व इतर विकासकामांच्या निविदाही काढण्यात आल्या असून आचारसंहिता शिथिल होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहा टीपी योजनांना मंजुरी मिळविण्यात आली. दरम्यान, दुसºया टप्प्याचा विकाससुद्धा टीपी योजनेच्या माध्यमातून करण्याचा सिडकोचा मानस आहे.
>गावांची संख्या झाली कमी
नैनाच्या दुसºया टप्प्यात २0१ गावांचा समावेश होता. त्यानुसार विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता; परंतु यातील काही गावे एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आल्याने दुसºया टप्प्यातील गावांची संख्या कमी झाल्याचे समजते. मात्र, नक्की किती गावे कमी झाली आहेत याचा अधिकृत तपशील समजू शकला नाही.
>नैनाच्या दुसºया टप्प्याच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील सातव्या टीपी योजनेलासुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे, तर आठवी टीपी योजना सूचना व हरकतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यातील ११ टीपी योजनांचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर लगेच नैनाच्या दुसºया टप्प्याच्या विकासकामाला सुरुवात केली जाईल.
- लोकेश चंद्र,
व्यवस्थापकीय संचालक, सिडको