‘नैना’ला चार वर्षांत मिळणार कोंढाणेचे ४०० एमएलडी पाणी; विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन
By कमलाकर कांबळे | Published: August 12, 2024 01:02 PM2024-08-12T13:02:15+5:302024-08-12T13:03:00+5:30
धरणाचे काम पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार; २००७ पासून रखडपट्टी
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कथित सिंचन घोटाळ्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरणाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे कार्यादेश देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कोंढाणे धरणामुळे सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नैना क्षेत्रातील शहरांची तहान भागविता येणार आहे. पुढील चार वर्षांत हे धरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने ठेवले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ४०० एमएलडी करण्याची योजना आहे.
उल्हास नदीवर कोंढाणे धरण आहे. २००७ पासून धरणाचा विस्तार रखडला. २०१७ मध्ये धरण सिडकोकडे हस्तांतरित झाले.तांत्रिक अडचणींमुळे धरणाचे काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी धरण बांधकामांसाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.
विस्थापित गावांचे होणार पुनर्वसन
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर कोंढाणे गावात ४०० हेक्टर जागेवर कोंढाणे धरण विकसित केले जाणार आहे. या धरणाची उंची ८० मीटर इतकी असणार आहे. ज्यामध्ये संपूर्ण जलाशय पातळी उंचावर आहे. प्रस्तावित धरणामुळे कोंढाणे आणि चोची ही दोन गावे विस्थापित होणार आहेत. या गावांतील ११८ कुटुंबांना सुमारे आठ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले जाणार आहे. बाधित झालेल्या इतर गावांमध्ये उदेवाई, कुणे आणि नांदगाव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिडकोने गावांच्या पुनर्वसनाचा आराखडाही तयार केला आहे.
प्रकल्पाचा खर्च वाढला
कोंढाणे धरणाची सध्याची पाणीसाठवण क्षमता १०५ एमएलडी इतकी आहे. त्यात वाढ करून ती ४०० एमएलडी करण्याची योजना आहे. धरण हस्तांतरित झाले त्यावेळी म्हणजेच सात वर्षांपूर्वी सिडकोने या कामाचा खर्च एक हजार कोटी रुपये निर्धारित केला होता. यात आता ४०० ते ५०० कोटींनी वाढ झाल्याचे समजते.
नैना क्षेत्रातील शहरांसाठी नियोजन
- सिडकोच्या माध्यमातून नैना क्षेत्राचा विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिघात १२ नगररचना परियोजनेच्या (टीपीएस) माध्यमातून १२ शहरे वसविली जाणार आहेत.
- त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ७३ गावांचा सर्वसमावेशक विकास केला जाणार आहे. नैनाच्या पहिल्या टप्प्यात सिडकाेने पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. जवळपास साडेसहाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मागविले आहेत. त्याचबरोबर पाण्याचेसुद्धा नियोजन सुरू केले आहे.
- कोंढाणे धरणामुळे नैना क्षेत्रातील नियोजित शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. नैना क्षेत्रातील नियोजित शहरांची पुढील वीस वर्षांतील संभाव्य लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा या धरणातून उपलब्ध होणार आहे.