‘नैना’च्या पहिल्या टीपी स्कीमला मंजुरी, पहिल्या टप्प्यात सात नगररचना परियोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 07:09 AM2018-09-27T07:09:53+5:302018-09-27T07:10:00+5:30
गतपाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या ‘नैना’ प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला अखेर मंजुरी मिळाली आहे.
नवी मुंबई - गतपाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या ‘नैना’ प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला अखेर मंजुरी मिळाली आहे. ‘नैना’ क्षेत्रातील आकुर्ली, बेलवली व सांगडे या गावांतील १९.१२ हेक्टर क्षेत्रफळाच्या विकासासाठी ही प्रारूप योजना मंजूर करण्यात आली आहे. याअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला सिडकोकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड या क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात होती. सुरुवातीच्या काळात ‘नैना’ क्षेत्राचा विकास ऐच्छिक योजनेच्या माध्यमातून करण्याची योजना होती; परंतु तेथील जमीनधारकांकडून व विकासकांकडून या योजनेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी, नगररचना परियोजना (टीपी स्कीम) लागू केल्याशिवाय ‘नैना’ क्षेत्राचा विकास साधणे शक्य नसल्याचे सिडकोच्या लक्षात आले. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली होती. आकुर्ली गाव परिसरात सुमारे ५० एकर क्षेत्राची पहिली टीपी स्कीम तयार करून मंजुरीसाठी ती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली होती.
राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्यात काही सुधारणा सुचविल्या होत्या. या सुधारणेनंतर २१ सप्टेंबर २0१८ रोजी मुंबई महानगर प्रदेशातील गेल्या तीन दशकांतील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, नगररचना परियोजनेला तेथील भूधारकांनी संमती दर्शविल्यानेच सिडकोने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सात टीपी स्कीमचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. असे असले तरी पहिल्या टीपी स्कीमला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी दोन योजना अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी दुसरी योजना अवलोकनासाठी पुणे येथील नगररचना संचालकाकडे पाठविण्यात आली आहे. तर ४४० हेक्टर क्षेत्रफळावर आकार घेणाºया तिसºया योजनेबाबत ४ व ६ आॅक्टोबर रोजी जमीनमालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या तिन्ही योजनांची अंमलबजावणी झाल्यास या क्षेत्रात ७० कि.मी. लांबीचे रस्ते, ८२ हेक्टर क्षेत्रफळाची मोकळी मैदाने, ३० हेक्टरवर पायाभूत सुविधा तर ३६ हेक्टर जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्मिती करता येईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात सात टीपी स्कीमचे नियोजन
‘नैना’च्या पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळाली असल्याने या क्षेत्राचा विकास साधण्याकरिता सिडकोने एकूण सात टीपी स्कीमचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.